सिडकोच्या ६९९ कोटीच्या सल्ल्यावर अधिवेशनात होणार सल्लामसलत 

घरे विक्रीसाठी ६९९ कोटींचा सल्ला सिडकोला पडणार महाग; घरे विक्रीचे ६९९  कोटींचे कंत्राट संशयाच्या धुक्यात

सिडकोच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह?

नवी मुंबई : सिडकोमार्फत बांधण्यात येणारी ९० हजार घरे व व्यावसायिक गाळ्यांची  विक्री होण्याकरीता त्याचे मार्केटींग, ब्रँन्डींग व सेल्स करण्यासाठी सिडकोने मे. थॉटट्रेन डिझाईन प्रा. लि. व मे. हेलिओस मेडियम बाजार प्रा. लि. या संयुक्त भागीदारीत असलेल्या कंपनीला दिलेले ६९९ कोटींचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे संबंधित कंपनीने आजतागायत एकाही सदनिकेची विक्री केली नसतानाही  या कंपनीला आतापर्यंत सिडकोने तब्बल १२८ कोटी रुपये अदा केल्याने सदर प्रकरणावर विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली आहे.

दरम्यान , येत्या ऑगस्ट महिन्यात सिडको घरांची लॉटरी काढणार आहे . या लॉटरीच्या नियोजनाच्या सल्ल्यासह लॉटरीद्वारे विक्री होणाऱ्या प्रति घरामागे एक लाख रुपये मोबदला म्हणून व निविदेतील अटी शर्तीनुसार कंत्राटदारास ४० टक्के रक्कम आगाऊ देण्याची तरतूद केली असल्यामुळे सिडकोने सदर रक्कम आगावू दिल्याचे बोलले जात आहे. या कंत्राटात भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे सदर बाब आता चर्चेचा विषय बनली आहे . म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चालू अधिवेशनात या कंत्राटावर सल्लामसलत करण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडली आहे.

भविष्यात सिडकोद्वारा उभारण्यात येणाऱ्या ९० हजार घरे व व्यावसायिक गाळ्यांची विक्री कशी करायची याबाबत सल्ला देणाऱ्या कंपनीची नियुक्ती करण्याचा ठेका सिडकोने मे. थॉटट्रेन डिझाईन प्रा. लि. व मे. हेलिओस मेडियम बाजार प्रा. लि. या संयुक्त भागीदारीत असलेल्या कंपनीला ३० जून २०२२ रोजी दिला आहे. या कंत्राटाच्या अनुषंगाने सल्ला देणाऱ्या कंपनीला एका घराच्या (सदनिकेच्या) विक्रीमागे १ लाख रुपये मोबदला देण्याचे ठरविण्यात आले आहे.

सदर कंत्राट आणि त्यातील अटी व शर्ती याबाबत सिडको वर्तुळात मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे. कोणीही अधिकारी या कंत्राटासंदर्भात स्पष्ट बोलण्यास तयार नाही. ज्यावेळेस हे कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात आले, त्यावेळेस फैय्याज खान हे मार्केटींग मॅनेजर म्हणून काम पाहत होते. त्यांच्याच सहीने कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली असून आता फैय्याज खान हे त्याविभागाचे महाव्यवस्थापक झाले आहेत. 

सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दराने घरे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सिडको काम करत आहे. तसेच सिडकोच्या घरांना अल्प उत्पन्न गट, मध्यम वर्गीय गट व उच्च उत्पन्न गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आला आहे. गत ५० वर्षात सिडकोला घरे विकण्यासाठी कुठल्याही मार्केटींग, ब्रॅन्डींग व सेल्स करणाऱ्या कंपनीच्या सल्ल्याची गरज भासली नाही. मग अचानक सिडकोला घरांच्या विक्रीसाठी सल्लागार कंपनी नेमण्याची गरज भासण्यामागे कोणाचे उखळ पांढरे करण्याचा सिडको व्यवस्थापनाचा इरादा आहे, असा प्रश्न सिडको कर्मचारी - अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.   

गत ५० वर्षात घरे बांधण्यापासून ते विकण्यापर्यंत सर्वच कामे सिडकोचे अधिकारी-कर्मचारी करत आले आहेत. त्याकरिता सिडकोचा इंजिनिअरींग, मार्केटिंग व जनसंपर्क विभाग सक्षम असल्याचे सिडको युनियनचे म्हणणे आहे. युनियनने देखील या ६९९ कोटींच्या सल्ल्याला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे घर विक्रीच्या नावाखाली फक्त जाहिरातबाजी व इव्हेंटवर सिडकोचाच पैसा खर्च करणाऱ्या कंपनीवर फक्त सल्ला देण्याकरिता ६९९ कोटींची उधळपट्टी योग्य नव्हे. त्यामुळे या संपुर्ण कंत्राटाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नवी मुंबईतील विविध संस्था व प्रकल्पग्रस्त संघटनांनी देखील केली आहे.

सिडको मार्केटींगवर अनाठायी पैसा खर्च करत असल्यामुळे  घरांच्या किंमतीमध्ये वाढ होऊन त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करुन घरांच्या विक्रीकरिता जाहिरातींवर खर्च न करता घरांच्या किंमती कमी करुन सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सोडत योजना काढण्याची आवश्यकता असल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व जयंत पाटील यांनी याप्रकरणी चालू अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. सभागृहात याप्रकरणी काय सल्लामसलत होते? याची उत्सुकता नवी मुंबईकरांना लागली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील ४ अनधिकृत शाळांविरुध्द फौजदारी गुन्हे