श्रवणयंत्रद्वारे कर्णबधीर विद्यार्थ्यांना आवाजाची भेट

अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते नवी मुंबईतील कर्णबधीर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप

नवी मुंबई : समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या तसेच खाजगी सर्वसामान्य मुलांसमवेत शिक्षण घेणाऱ्या विविध प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांकरिता महापालिका शिक्षण विभाग दक्षेतेने कार्यरत आहे. सदर विशेष मुले शैक्षणिक विकासाच्या प्रवाहात कुठेही मागे पडू नयेत, याकरिता सतर्कता राखली जात आहे. या विशेष विद्यार्थ्यांना ब्रेलकाठी, व्हीलचेअर, श्रवणयंत्रे अशा प्रकारची आवश्यक साधने त्यांच्या दिव्यांगत्वानुसार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.

असाच एक विशेष प्रयत्न सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांच्या विशेष पुढाकारातून करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील श्रवणदोष असणाऱ्या शासकीय यू-डायस ॲपवर नोंदीत ६४ कर्णबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.

सेवाभावी वृत्तीने लोकोपयोगी समाजकार्य करणाऱ्या अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदय फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आरसीई फाऊंडेशन या शासकीय संस्थेला विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ‘आरसीई फाऊंडेशन'च्या सीएसआर निधीतून अलिम्को या संस्थेच्या माध्यमातून सदर श्रवणयंत्रे उपलब्ध करुन देण्यात आली.

अशाप्रकारे एक हजाराहुन अधिक श्रवणयंत्रे विविध शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असून नवी मुंबईतील यू-डायस ॲपवर नोंदीत ६४ कर्णबधिर विद्यार्थ्यांना सदर श्रवणयंत्रे अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते वाशी, सेक्टर-१५ मधील महापालिका शाळा क्र.२८ येथे वितरीत करण्यात आली.

श्रवणयंत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऐकायला येऊ लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अत्यंत मोलाचा असल्याची भावना अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सदर श्रवणयंत्रे वितरीत करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची श्रवणचाचणी घेण्यात आली होती. तसेच त्यांच्या श्रवण क्षमतेची तपासणी करुन आणि कानाचे माप घेऊन प्रत्येक कर्णबधिर विद्यार्थ्यांला त्याच्यासाठी सुयोग्य श्रवणयंत्रे तयार करुन उपलब्ध करुन देण्यात आली.

गिपटींग साऊंड या अभिनव नावाने संपन्न झालेल्या सदर श्रवणयंत्रे वाटप प्रसंगी महापालिका शिक्षण अधिकारी अरुणा यादव, समावेशित शिक्षण समन्वयक अनिता मोजाड, शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जगदिश टोले, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळू खटके, ईटीसी केंद्र अधीक्षक उज्वला पाटील तसेच इतर शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल तालुक्यातील १७००  हेक्टर खाजगी जमीनीचे भूसंपादन धोक्यात