पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यावरील उपाययोजना याविषयीची आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी पूर्णतः सजग राहावे -ना. शंभूराज देसाई

ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी पूर्णतः सजग राहावे. आपत्तीच्या वेळी कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन जलद गतीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश ‘ठाणे'चे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यावरील उपाययोजना याविषयीची आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

सदर बैठकीस आमदार किसन कथोरे, गीता जैन, मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रमोद (राजू) पाटील, संजय केळकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंह, ठाणे महापलिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस सह-आयुक्त दत्तात्रय कराळे, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)'चे अधिकारी तसेच महसूल, पोलीस, महावितरण, नागरी संरक्षण दल यासह विविध शासकीय विभागांचे विभाग, कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

आपत्तीचा कोणताही प्रसंग उद्‌भवल्यास त्या ठिकाणी नागरिकांना तातडीने मदत पोहोचण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा आढावा घेऊन त्याविषयी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. आरोग्य विभागाने साथीचे रोग पसरु नयेत, याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी. आपत्ती प्रसंगी नागरिकांना सुखरुपपणे राहता यावे, याकरिता जी निवारा केंद्र स्थापित करण्यात आलेली आहेत, ती निवारा केंद्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा असाव्यात, याकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे, असा ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पोलीस विभागाने जास्तीत जास्त पेट्रोलिंग करावे. रात्रीची गस्त वाढवावी, अशा सूचना ना. देसाई यांनी पोलीस विभागांना दिल्या. त्याचबरोबर ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी वीजसंबंधी उद्‌भवणाऱ्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद द्यावा. आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता कायम सज्ज ठेवावी, असेही ते म्हणाले.

सर्व विभागांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपापसात आवश्यक तो समतोल आणि समन्वय साधावा. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टीची गरज लागल्यास शासनाकडे त्याची तात्काळ मागणी करावी. उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचनांप्रमाणे नदी खोलीकरण, निवारा केंद्रांची दुरुस्ती, साकव दुरुस्ती आदि विषयांबाबतच्या कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठवावेत. शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगत ना. शंभूराज देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातील विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीविषयी समाधान व्यवत केले.

सदर बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी तसेच सर्व महापालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी याविषयीची थोडक्यात माहिती सादर केली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्रवणयंत्रद्वारे कर्णबधीर विद्यार्थ्यांना आवाजाची भेट