घारापुरी बेटवासियांवर यापुढील आणखी काही महिने अंधारात राहण्याची वेळ

 ‘पाऊस, भरती-आहोटी'च्या अडथळ्यांमुळे सबमरिन केबल्स दुरुस्ती मध्ये अनेक अडचणी

उरण : घारापुरी बेटावर २०० केव्हीए रोहीत्राद्वारे समुद्राखालील वीजपुरवठा करणाऱ्या तीन सबमिशन केबल्स नादुरुस्त झाल्या आहेत. मात्र, पाऊस, समुद्रातील भरती-आहोटी आणि इतर उदभवणाऱ्या अपरिहार्य परिस्थितीवर मात करुन केबल्स दुरुस्ती करण्यात महावितरण विभागाला अवघड होऊन बसले आहे. यातच पहिल्या ठेकेदारांनी दुरुस्तीच्या कामासाठी हात वर केल्याने महावितरण द्वारे केबल्स दुरुस्ती कामाच्या वेळेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे घारापुरी बेटवासियांवर यापुढील काही महिने तरी वीजपुरवठा पुर्ववत होईपर्यंत अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच बेटवासियांवर मागील महिन्यापासून वीजेच्या संकटांचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली असून, ठिकठिकाणी असलेल्या उघड्या केबल्स आणि नादुरुस्त डीपीमुळे नागरिक, जनावरांना वीजेचे शॉक लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. ‘महावितरण'च्या अनागोंदी कारभारामुळे बेटवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घारापुरी ऐतिहासिक बेट ‘महावितरण'च्या पनवेल शहर विभागाच्या अंतर्गत येत आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये तीन २२ केव्ही सिंगल कोर सबमरीन केबलच्या सहाय्याने २०० केव्हीए रोहीत्राद्वारे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावात विद्युत पुरवठा कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, २० कोटी खर्चून समुद्राखालील वीजपुरवठा करणाऱ्या तीन सबमरिन केबल्स मागील महिन्यात नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे घारापुरी बेटावर वीजेची समस्या निर्माण झाल्याने रहिवाशांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. थ्री-फेज सप्लाय नसल्याने पाणी पुरवठा करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीला सध्या जनरेटरचा वापर करावा लागत आहे. यामुळे ग्रामपंचायतीला अतिरिक्त खर्चाचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

दरम्यान, महावितरण विभागाने घारापुरी बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील ठेकेदारानी घिसाडघाईने टाकलेल्या सबमरिन केबल्स नादुरुस्त झाल्या आहेत. या नादुरुस्त सबमरिन केबल्सच्या दुरुस्तीसाठी महावितरण विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, या सबमरिन केबल्स दुरुस्तीच्या कामासाठी याआधी काम केलेल्या केबल्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या खासगी ठेकेदार कंपनीने प्रतिसाद दिला नसल्याने आता दुरुस्तीचे काम दुसऱ्या ठेकेदाराला सोपविण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीने ड्रायव्हर्सच्या सहाय्याने नादुरुस्त केबल्स शोधून काढले आहेत. यानंतर समुद्रातील सबमरिन केबल्सच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे.  समुद्रातील सबमरिन केबल्सच्या दुरुस्तीचे काम पाऊस, समुद्रातील भरती-आहोटी आणि इतर उदभवणाऱ्या अपरिहार्य परिस्थितीवर मात करुन सुरु आहे. यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मात्र सबमरिन केबल्स दुरुस्तीच्या कामाबाबत निश्चित कालावधी सांगता येणार नाही, असे ‘महावितरण'च्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी माहिती देताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेटवासियांना यापुढील काही महिने वीजपुरवठा पुर्ववत होईपर्यंत अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपण्याचीच अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

समुद्रातील सबमरिन केबल्सच्या कामातील त्रुटींबाबत घारापुरी ग्रामपंचायतीने याआधीच वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन कळविण्यात आले होते. मात्र, त्याकडे महावितरण अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. ‘महावितरण'च्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच घारापुरी बेटवासियांवर मागील महिन्यापासून वीजेच्या संकटांचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ठिकठिकाणी असलेल्या उघड्या केबल्स आणि नादुरुस्त डीपीमुळे नागरिक, जनावरांना वीजेचे शॉक लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. नुकतेच घरासमोरील डीपीमुळे मानसी आवटे यांना वीजेचा झटका बसून दुखापत झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने त्या बचावल्या आहेत. वीजेमुळे व्यावसायिक आणि रहिवासी चिंतेत आहेत. याबाबत तातडीने बैठक बोलावण्यासाठी महावितरण, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना पत्रही देण्यात आले आहे, अशी माहिती ‘घारापुरी ग्रामपंचायती'च्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

केबल्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने समुद्रातील सबमरिन केबल्सच्या दुरुस्तीचे काम करण्यास प्रतिसाद दिला नसल्याने कंपनीची ८० लाखांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. जहाजांच्या ॲकरिंगमुळेच सबमरिन केबल ठिकठिकाणी नादुरुस्त झाली आहे. दुसऱ्या ठेकेदारामार्फत समुद्रातील सबमरिन केबल्स दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. - एस. ए. सरोदे, मुख्य कार्यकारी अभियंता - महावितरण, पनवेल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चार महिन्यात १५० कोटीहून अधिक मालमत्ता कर वसुली