सानपाडा सेक्टर २ मध्ये नादुरूस्त व बंद अवस्थेत पथदिवे 

दुर्घटना घडल्यावर महापालिका कार्यवाही करणार का? -  पांडुरंग आमले

नवी मुंबई :  सानपाडा सेक्टर २ मधील नादुरूस्त व बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची पालिका आयुक्तांकडे सातत्याने लेखी मागणी करूनही व आयुक्तांनी कारवाईसाठी फॉरवर्ड करूनही जनतेला अंधारातच ये-जा करावी लागत आहे. महिलेचा विनयभंग, मुलींची छेडछाड अथवा त्याहून भयानक घटना घडल्यावर नवी मुंबई महापालिका प्रशासन समस्या निवारणासाठी कारवाई करणार का? असा संतप्त सवाल भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना विचारला आहे.

सानपाडा सेक्टर २ मध्ये पथदिवे बंद असल्याने अंधारातच रहीवाशांना ये-जा करावी लागते. महिला व मुलींच्या बाबतीत पावसामध्ये अंधाराचा गैरफायदा घेवून अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने पांडुरंग आमले यांनी १२ जुलै आणि १७ जुलै पालिका आयुक्तांना निवेदन देवून समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देताना समस्येचे तात्काळ निवारण करण्याचे निर्देश दिले. परंतु कार्यवाहीच झाली नसल्याने व अजूनही अंधारच असल्याने आयुक्तांच्या आदेशाला प्रशासन केराची टोपली दाखवते असा याचा यातून अर्थ काढायचा का? असा संतप्त प्रश्न पांडुरंग आमले यांनी विचारला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, पदपथ व अन्य कामांबाबत आपण सानपाडा-जुईनगर नोडमध्ये पाहणी अभियान राबवून कामांची पाहणी करावी यासाठी आम्ही आपणाकडे  यापूर्वीच पाहणी अभियान करण्याची लेखी मागणी केली होती. आपल्या कार्यालयाकडून केवळ निवेदन फॉरवर्ड करण्यात आले, परंतु कार्यवाही झालीच नाही. आज सांयकाळनंतर सानपाडा सेक्टर २ परिसरात काळाकुट्ट अंधार पसरलेला दिसून येत आहे. पथदिवे सर्वच बंद असल्याने अंधाराचा गैरफायदा घेत समाजातील विकृतांकडून महिलांची तसेच मुलींची छेडछाड अथवा अन्य गैरप्रकारही होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पावसामध्ये काही घटना घडल्यास कोणाला आवाजही जाणे शक्य नाही. अंधारात ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता सानपाडा सेक्टर २ परिसरातील प्रियंका सोसायटीपासून ते निळकंठ टॉवरपर्यत बंद असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा अशी लेखी मागणी पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली होती.

ही समस्या सोडविण्यासाठी पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्तांकडे १२ जुलै व १७ जुलै २०२३ रोजीही लेखी निवेदन दिले होते. समस्येचे गांभीर्य व अंधाराचा गैरफायदा घेत समाजविघातक शक्ती महिलांबाबत, मुलींबाबत गैरप्रकार करण्याची भीती आहे. पावसाचे दिवस आहेत. पावसामध्ये दुर्घटना घडल्यास आवाजही येणार नाही. समस्या गंभीर आहे. करदात्या नागरिकांना या परिसरातून अंधारातच ये-जा करावी लागत आहे. आपण येथील पथदिवे तातडीने दुरूस्त करण्याविषयी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांना कळकळीची विनंती केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विद्युत विभागाच्या कामाची पुन्हा एकदा ‘पोलखोल'