विद्युत विभागाच्या कामाची पुन्हा एकदा ‘पोलखोल'

नवी मुंबई शहरात वीज पोल पडण्याच्या घटनांमध्ये वाढ?

वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे नवी मुंबई शहरात जुने विद्युत पोल काढून नवीन पोल बसवले जात आहेत. मात्र,  मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातील वीज पोल पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, २१ जुलै रोजी ऐरोली सेक्टर-२९ मध्ये दोन विद्युत पोल पडल्याची घटना घडली  आहे. या घटनेमुळे विद्युत विभागाच्या कामाची पुन्हा एकदा ‘पोलखोल' झाली आहे.

‘सिडको'ने नवी मुंबई शहर वसवल्यानंतर येथील रस्त्यावर दिवाबत्तीची सोय केली होती. मात्र, ३० वर्षांनंतर वीज पोल जुने झाले म्हणून २०१८ साली नवी मुंबई शहरातील जुने पोल काढून नवीन पोल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण ४७ हजार वीज पोल बदलण्यासाठी ६५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. तसेच ‘वीज पोल'च्या देखभाल, दुरुस्तीवर अतिरिक्त खर्च सुरु आहे. मात्र, सदर ‘वीज पोल'चे काम करताना महापालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचे अधिक लाड पुरवल्याने कामाचा दर्जा राखला गेला नाही. त्यामुळे अल्पावधीतच विद्युत पोल पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मे-२०२१ मध्ये पामबीच मार्गावर एक नवीन वीज पोल पडून ऐरोली मधील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर अलिकडे नेरुळ, वाशी, कोपरखैरणे सेक्टर-१४ मध्ये पोल पडण्याची घटना ताजी असताना ऐरोली सेक्टर-२९ मध्ये एका वाहनाला केबल अडकल्याने दोन वीज पोल पडल्याची घटना घडली आहे. मात्र, सदर वीज पोलचा पाया कमी खणल्याने वीज पोल पडल्याचे  प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. त्यामुळे वीज पोल बसवताना विद्युत अभियंत्यांनी आपल्या जबाबदारीचा गाडा योग्य न हाकल्याने वीज पोलच्या  कामांचा दर्जा सुमार असल्याने अल्पावधीतच वीज पोल पडत आहेत, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.


ऐरोली मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या विद्युत पोलवर मनाई असून देखील केबल टाकण्यात आली होती. सदर केबल वाहनाला अडकल्याने वीज पोल पडले. त्यामुळे सदर केबल धारकांविरोधात पुढील कार्यवाही करण्यासाठी अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. -  प्रवीण गाडे, कार्यकारी अभियंता -परिमंडळ २, विद्युत विभाग, नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पायाभूत सुविधांमध्ये वैद्यकिय आरोग्य सेवांवरती महापालिकेचा भर