पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी

अतिवृष्टी दरम्यान सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरु असून, अतिवृष्टी दरम्यान नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील पाणी साचण्याच्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. २८ आणि २९ जून रोजी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जी निरीक्षणे होती त्यानुसार ठाणे शहरातील काही भागात उदा. चिखलवाडी, वंदना सिनेमागृह, पेढ्या मारुती आदी ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचना दिल्या होत्या. सदर उपाययोजनामुळे पाणी साचणाऱ्याा ठिकाणी पाणी साचण्याच्या स्थितीत काही बदल झाला आहे का?, याची देखील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.

२८ जून रोजी २०० मि.मी पाऊस झाला होता, तुलनेत १९ जुलै रोजी देखील तितक्याच प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही दिवशी पावसाची तीव्रता अधिक होती. विशेष करुन १९ जुलै रोजीच्या रात्री पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणि भरतीच्या वेळेची नोंद ठेवून अतिवृष्टीच्या काळात सर्व यंत्रणा कृतीशील राहतील याचीही दक्षता घ्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत केली.

ठाणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे डोंगर उतारावरुन येणाऱ्या पाण्याबरोबरच दगड-माती वाहून रस्त्यावर येते. तसेच काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर मातीसदृश्य कचरा  दीर्घकाळ पडून राहिल्यामुळे रस्ता खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे रस्ता साफसफाईवर कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. मागील तीन दिवस झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि २१ जुलैपासून हवामान खात्याने ऑरेंज ॲलर्ट कमी करुन यलो ॲलर्ट जाहीर केला असल्यामुळे जास्तीच्या पावसाची शक्यता कमी आहे. यावेळी रस्ते साफसफाईकडे जास्त लक्ष केंद्रीत करावे. तसेच दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्त्याची परिस्थिती खराब झाली असेल तर त्यासाठी देखील प्रत्यक्ष जागेवर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन मास्टकी तंत्रज्ञानाद्वारे रस्त्याची डागडुजी केली जाईल याची निश्चिती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या काळामध्ये लो-लाईन एरिया जिथे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे अशी ठिकाणे शोधून त्या ठिकाणच्या कुटुंबांना स्थलांतरीत करण्याची गरज असेल तर त्यासाठी प्रभाग समिती निहाय निश्चित केलेल्या शाळा आणि समाजमंदिरे येथे वेळीच स्थलांतर करण्याबाबतही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत सूचित केले.

दरम्यान, १९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे शहरातील काही भागांची पाहणी केली. ठाणे शहरातील गुन्हे अन्वेषण विभाग परिसरात पाणी साचत असल्याने सदर ठिकाणी लावण्यात आलेले पंप पावसाळी गटारांना जोडण्याची सूचना यावेळी देण्यात आली. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे कार्यालय सखल भागात असल्यामुळे तेथे पाणी साचण्याची शक्यता वाढते, ते पाहता त्या कार्यालयाची पुर्नबांधणी करताना बांधकामाचा जोता रस्त्याच्या वर राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या.

कळवा मधील सह्याद्री परिसरातील नाल्याची पाहणी केली असता सदर नाला रस्त्याच्या खाली ज्या कल्व्हर्ट मधून जातो त्या कल्व्हर्टची उंची कमी असल्यामुळे अतिवृष्टी आणि भरतीच्या वेळी पाण्याचा फुगवटा होवून नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन परिसरामध्ये पाणी साचते. सध्या पंपाच्या माध्यमातून या परिस्थितीवर काही मार्ग निघू शकतो का, ते पडताळून पाहण्याच्या सूचना यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल्या. तद्‌नंतर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून या रस्त्यांची पुर्नबांधणी करुन रस्त्याखालील कल्व्हर्टची उंची वाढवावी जेणेकरुन पाण्याचा निचरा अधिक चांगल्या पध्दतीने होवू शकेल. यापूर्वी के. व्हिला येथील पुलाखालील पाणी बाजूच्या सोसायटीत शिरत होते. मात्र, तेथील कलव्हर्टची रुंदी वाढविल्यामुळे या नाल्यातील पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता कमी झाली आहे. याच धर्तीवर सह्याद्री येथील नाल्याबाबत देखील उपाययोजना करण्याची सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

विटावा सब-वे येथे रेल्वे पुलाखाली पंप बसविण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत असला तरी अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ उपलब्ध राहिल आणि वापरण्यात येणारे पंप सुस्थितीत असतील याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देखील संबंधितांना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. विटावा सब-वे कडे येणाऱ्या नाल्यालगत रेल्वेने भराव टाकल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मागील पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. यावर्षी पावसाळापूर्व कामांमध्ये सदर भराव हटवून या ठिकाणी पाईप लाईन टाकल्यामुळे पाण्याचा निचरा योग्‌य पध्दतीने होवून सब-वे मध्ये पाणी साचण्याची शक्यता कमी झाली आहे.

सिडको बसस्टॉप येथील रेल्वे बोगद्यामध्ये भरतीच्या वेळी पावसाचे पाणी साचत असून, सद्यस्थितीत या ठिकाणी पंप बसविण्यात आला आहे. मात्र, तरी देखील रस्त्यावरील पाण्याचा संपूर्णपणे निचरा वेळोवेळी व्हावा यासाठी रस्त्याच्या बाजूला खड्डा तयार करुन त्यामधून पाणी उचलण्याची उपाययोजना करावी, यामध्ये रस्त्याच्या लेवलपेक्षा खालून पाणी उचलले तर रस्त्याच्या लेवलला पाणी येण्यापूर्वी त्याचा निचरा करणे शक्य होईल आणि वाहतुकीला कुठलाही प्रतिरोध होणार नाही या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान दिल्या आहेत.

यावेळी ठाणे महापालिका उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे यांच्यासह संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त देखील उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा सेक्टर २ मध्ये नादुरूस्त व बंद अवस्थेत पथदिवे