शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
पनवेल महापालिका ‘शहर कृती दल'ची बैठक
लसीकरण, मिशन इंद्रधनुष्य, राष्ट्रीय जंतनाशक-अतिसार नियंत्रण कार्यक्रमाबाबत चर्चा
पनवेल : नियमीत लसीकरण कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य मोहिम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविण्यासाठी १९ जुलै रोजी पनवेल महापालिका मुख्यालयात ‘शहर कृती दल'ची बैठक उपायुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. याप्रसंगी महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माता-बाल संगोपन आरोग्य अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, ‘शहर कृती दल'चे सदस्य, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी, एएनम, जीएनम, महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नियमीत लसीकरण कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य मोहिम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविले जातात. सदर कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी ‘शहर कृती दल'ची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी महापालिकेला सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले.
पुढील महिन्यात महापालिका कार्यक्षेत्रात विशेष इंद्रधनुष्य मिशन राबविण्यात येणार आहे. यामध्ये ० ते ०५ वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती महिलांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, बांधकाम क्षेत्रात राहणाऱ्या स्थलांतरीत वसाहती मधील मुलांचे सर्वेक्षण यामध्ये केले जात आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अतिसार नियंत्रण पंधरावडा महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे, असे उद्दिष्ट ठेवून राज्यभरात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अभियान अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना ओआरएस पाकिटे, अतिसार आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यामध्ये वय वर्षे १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा ,अंगणवाडी केंद्र, समुदायस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी इंग्रजी आणि मराठी माध्यामांच्या शासनमान्य तसेच खाजगी शाळा, आश्रमशाळा, नवोदय शाळा, सुधारगृह यामध्ये पत्र देणे, शाळांच्या मुख्यध्यापकांच्या ऑनलाईन बैठकांचे आयोजन करणे, यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच आशांमार्फत गोळ्या वाटप, इतर सुविधा पुरविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.