कोकण विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  

 ‘माझी वसुंधरा अभियान 'ची अंमलबजावणी प्रभावीपणे करा -डॉ. कल्याणकर

नवी मुंबई :  माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत निसर्गाशी संबधित भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूत तत्वांना विचारात घेऊन सदर ‘अभियान'ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

माझी वसुंधरा अभियान ४.० संदर्भात १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुवत डॉ. कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीस कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुल जिंदल, ‘पालघर जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, ‘रायगड जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ‘रत्नागिरी जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजारा, ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, आदि उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अमंलबजावणी, इतर आस्थापना विषयक कामांचा आढावा यावेळी आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी बैठकीत घेतला.

‘माझी वसुंधरा अभियान ४.०'मध्ये ई-वाहने वापराबाबत प्रसार-प्रसिध्दी करण्यात यावी, ई-चार्जिंग सबस्टेशन (ई-चार्जिंग पॉईंट) बसविण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. विभागामध्ये पुढील अडीच महिन्यात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम एकाच वेळी घ्यावेत. सदर कार्यक्रमांमध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, वन विभाग आणि कृषि विभाग, सामाजिक वनीकरण, आदि विभागांचा सहभाग घेण्यात यावा. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०' अंतर्गत टप्पानिहाय कामकाजाचे वेळापत्रक करावे, कॅच द रेन मोहीम सर्व जिल्ह्यांनी राबवावी. जिल्ह्यामध्ये शक्य त्या सर्व कार्यालयात सौर उर्जा प्रकल्प राबवावा. पर्यावरण संरक्षण-संवर्धन या संबंधाने जनजागृती व्हावी यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०'बाबत गाव पातळीपर्यंत प्रचार-प्रसिध्दी तसेच जनजागृती (आयईसी) करुन ‘अभियान'मध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा. कोकण विभागातील शहरी भागांमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.  

विभागीय आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोकण विभागातील सर्व २९९० ग्रामपंचायतीनी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०'मध्ये नोंदणी करुन सहभाग घेतला आहे. यात ठाणे जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायत, पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायत, रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायत, रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका ‘शहर कृती दल'ची बैठक