जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
लिडार तंत्रज्ञानाव्दारे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश
अभियांत्रिकी विभागाने लिडार सर्वेक्षणाची संपूर्ण कार्यवाही सप्टेंबर महिन्यातच एजन्सीकडून पूर्ण करून घ्यावी -आयुक्त नार्वेकर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या लिडार तंत्रज्ञानाव्दारे सुरु असलेले सर्वेक्षण काम 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावेत असे निर्देश देत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यापुढील काळात प्रत्येक आठवड्यात जेवढे सर्वेक्षण काम पूर्ण होईल त्याची माहिती दर सोमवारी मालमत्ताकर विभागास उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या लिडार तंत्रज्ञानाव्दारे सुरु असलेल्या सर्वेक्षण कामाला गती देण्यासाठी व ते जलद पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. याप्रसंगी अति. आयुक्त तथा मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख सुजाता ढोले, प्रशासन-मालमत्ता विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, अति.शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) सुनील लाड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
लिडार तंत्रज्ञानाव्दारे होत असलेले सर्वेक्षण सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. त्यादृष्टीने उर्वरित कामाचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ वाढवावे. पण, सर्वेक्षण कार्यवाही पूर्णच करावी.ऑक्टोबरमध्ये दिली जाणारी मालमत्ताकराची सहामाही देयके या सर्वेक्षणातून संकलित माहितीनुसार दिली जावीत असा महापालिकेचा प्रयत्न असून त्यादृष्टीने सर्वेक्षण कार्यवाहीला कालबध्द गतीमानता दिली जात आहे. सर्वेक्षणामुळे सद्यस्थितीत मालमत्ताकरच्या कक्षेत नसलेल्या व सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्ता या मालमत्ताकराच्या कक्षेत येणार आहेत. त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवण्यात आले असून सर्वेक्षण कार्यवाहीत कोणतेही अडथळे येऊ नयेत याकरिता विभाग कार्यालय स्तरावरील दोन कर्मचारी लिडार सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेस सहकार्याकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तशा प्रकारचे आदेश निर्गमित करण्याबाबत आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. त्यासोबतच सर्वेक्षण पथकासोबत पोलीसही उपलब्ध करून देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
लिडार तंत्रज्ञानाव्दारे 360 डिग्रीमध्ये विस्तीर्ण स्वरूपात मालमत्तांचे सर्वेक्षण होत असल्याने व त्यात मोबाईल मॅपिंग सिस्टीमचा वापर करण्यात आल्याने संपूर्ण महापालिका क्षेत्राचा अद्ययावत बेसमॅप तयार होत असून त्यामध्ये उड्डाणपूल, अंडरपास, नाले, होर्डिंग, मोबाईल टॉवर अशा विविध गोष्टींची अद्ययावत माहिती महानगरपालिकेस उपलब्ध होणार आहे. ही माहिती मालमत्ताकर विभागासह अभियांत्रिकी, परवाना, मालमत्ता अशा इतरही विभागांनाही उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांनाही त्यांच्या कामात या माहितीचा उपयोग होईल, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
लिडार तंत्रज्ञानाव्दारे होणा-या सर्वेक्षणांतील माहिती दर आठवड्यात सोमवारी उपलब्ध करून दिली जाणार असून या माहितीचा उपयोग करून मालमत्ताकर विभागाने आपली पुढील कार्यवाही सुरू करावी. अभियांत्रिकी विभागाने लिडार सर्वेक्षणाची संपूर्ण कार्यवाही सप्टेंबर महिन्यातच एजन्सीकडून पूर्ण करून घ्यावी, असे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले.