ठाणे महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी

ठाणे महानगरपालिकेतील ३५ वर्षावरील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांची सोनोमॅमोग्राफीसह आरोग्य तपासणी प्रत्येक वर्षी विनामूल्य करणार : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे : रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात नोकरी करणाऱ्या महिलांची रोजचीच तारेवरची कसरत सुरु असते. ठाणे महापालिकेमध्येही कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचारी या देखील दैनंदिन नागरी हिताची कामे करीत असतात. ठाणे महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचारी यांचे लोकोपयोगी नागरी कामे करताना स्वतःच्या आरोग्याकडे अनावधानाने दुर्लक्ष होते. चांगला समाज घडविण्यासाठी सुदृढ आणि निरोगी अधिकारी-कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महापालिका मधील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महिलांमध्ये उदभवणाऱ्या दुर्धर आजारांचे वेळीच निदान व्हावे यासाठी सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाचा कर्करोग या चाचण्या आणि मोफत आरोग्य तपासणी प्रत्येक वर्षी विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरात असंसर्गजन्य आजारांमुळे (उदा. पक्षघात, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब) सुमारे ७४ टक्के नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने असंसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्याचे ध्येय ठेवलेले आहे. कुटुंबातील सदस्यांवर आणि सामाजिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहता, असंसर्गजन्य आजारांच्या आवश्यक असलेल्या तपासण्या वेळीच करून त्यावर त्वरीत उपचार करणे, काळाची प्राथमिक गरज आहे. तसेच मधुमेह आणि रक्तदाब आजार रुग्णांच्या नकळत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घर करुन मृत्यूस कारणीभूत ठरत असतात. महिलांमध्ये असलेल्या स्तनाचा आणि र्गभपिशवीचा कर्करोग या आजारांचे प्रमाण जास्त आहे. या आजारांची  तपासणी करुन ते समुळ नाहीसे करणे शक्य आहे. यासाठी महिलांनी देखील गांभिर्याने आणि काळजीपूर्वक आरोग्य चाचण्या करुन घेणे गरजेचे आहे.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील ३५ वर्ष किंवा ३५ वर्षांवरील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले आहेत. तसेच या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा, ठाणे येथे वरील आजारांच्या चाचण्या करुन आजाराचे निदान करण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सोनोमॅमोग्राफी आणि रक्त तपासणी करण्यासाठी शुल्क आकारले जात होते. मात्र, आता या सर्व चाचण्या महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत केल्या जाणार असून, यापुढे सातत्याने सदर योजना महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी महिलांसाठी सुरु राहणार आहे. या योजनेचा फायदा घSवून महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचारी यांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी प्राधान्याने या चाचण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाळेतील  अंतर्गत सुरक्षा  वाढवण्याची पालकांची मागणी