‘महावितरण'चा अजब कारभार

 मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा खंडीत

नवी मुंबई : स्वतःच्या लामालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या करदात्या नागरिकांना अनेकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. २१ व्या शतकातील महानगरातील नागरिकांना केवळ वीज पुरवठा खंडीत झाला म्हणून वारंवार पाण्यावाचून दिवस काढावा लागतो, हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. १५ जुलै रोजी तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अडथळा नको म्हणून ‘महावितरण'कडून वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबई महापालिका हद्दीतील वाशी विभागात पाणी पुरवठा करणारे तीन जलकुंभ आहेत. सेक्टर-१५, सेक्टर-१० आणि सेक्टर-१० ए अशा तीन ठिकाणी असलेल्या जलकुंभांना ‘महावितरण'च्या हायटेन्शन लाईनवरुन वीज पुरवठा केला जातो. अनेकदा केवळ या हायटेन्शन लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाशीमधील रहिवाशांचा पाणी पुरवठा खंडीत झाल्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल झालेले आहेत. नागरिकांनी अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत झाल्याचे स्वीकारुन त्यापोटी होणारा त्रास सहन केला आहे.

मात्र, १५ जुलै रोजी ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनी कहरच केला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विष्णुदास भावे जवळून वाशीकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभांना वीज पुरवठा करणारी ‘महावितरण'ची हायटेन्शन केबल जाते. सदर भागात ‘शिवसेना'च्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे लावले होते. तसेच मुख्यमंत्र्यांवर फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत करण्यासाठी सुमारे पाच-सहा जेसीबी तैनात केले होते. त्यामुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यास विष्णुदास भावे येथील वीज पुरवठा देखील बंद होण्याची शक्यता गृहीत धरुन, प्रसंगी सत्ताधाऱ्यांची बोलणी खावी लागतील, हीच बाब महत्वाची मानून ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी वाशी विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभांचा वीजपुरवठा सायंकाळ पासून ते मुख्यमत्र्यांचा सत्कार सोहळा संपेपर्यंत बंद ठेवण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे वाशीतील नागरिकांना सायंकाळचा पाणी पुरवठा न झाल्याने त्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले.

त्यामुळे नागरिकांनी ‘महावितरण'च्या वाशी कार्यालयात पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाचा वीज पुरवठा कधी पूर्ववत होणार? याबाबत विचारणा केली असता तेथील फोन उचलणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने आणि वीज पुरवठ्यामध्ये बाधा येवू नये म्हणून वीज पुरवठा बंद ठेवला होता आता तो सुरु करण्यात येईल, असे धडधडीत उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ‘महावितरण'चा वीज पुरवठा खंडीत झालेला असल्यामुळे संध्याकाळी वाशी, सेक्टर-९, ९ए ,१०, १०ए,१५,१६ आणि जुहुगांव येथे होणारा पाणी पुरवठा रात्री साडेनऊ नंतर करण्यात येईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असा संदेश महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना देण्यात आला होता. पण, त्यामागचे कारण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, अशी बाब दडपण्यात आली होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मसाला बाजारातील सुका मेवा दुकानाला भीषण आग