एपीएमसी मसाला बाजारातील सुका मेवा दुकानाला भीषण आग

अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मसाला बाजार आवारातील एच-२३ या सुका मेव्याच्या दुकानाला १७ जुलै रोजी पहाटे सव्वा तीन वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी संपूर्ण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे १५ तासापेक्षा अधिक वेळ प्रयत्न सुरु होते.
एपीएमसी मसाला बाजार आवारात खजूर, अक्रोड, काजू, बदाम आदी सुक्या मेव्यासह मोठ्या प्रमाणावर मसाला दुकाने आहेत. १७ जुलै रोजी पहाटे सव्वातीन वाजता येथील एच-२३ या सुका मेव्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीची घटना समजताच वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुकानात मोठ्या प्रमाणात अक्रोड आणि  पॅकिंग साहित्य असल्याने आग अधिकच भडकली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आग १७ जुलै रोजी सायंकाळ पर्यंत धुमसतच होती. सुका मेव्याच्या दुकानाला लागलेली आग शॉर्टसर्कटि मुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, सुदैवाने या  आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या घटनेने एपीएमसी बाजार समितीतील अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीतील फॅन्टासिया पार्क मधील अग्निसुरक्षा बंद