अवघ्या तीन महिन्यात १५० कोटीची वसुली

पनवेल मधील नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्तम प्रतिसाद

पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर देयकांच्या वसुलीवरती भर देत असून, चालू आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. १ एप्रिल पासून ते १७ जुलै २०२३ पर्यंत १५० कोटी रुपये इतका मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाला आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रवकमेची करवसुली प्रथमच झाली आहे.

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिका द्वारे मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सातत्याने सुरु आहे. जादा मालमत्ता कर देयक भरायचे राहिले असलेल्या मालमत्ताधारकांवरती कारवाईसाठी महापालिकेने चार प्रभागांसाठी आठ पथके तयार केली आहेत. यामध्ये खारघरसाठी २ पथक, कामोठेसाठी २ पथक, नावडेसाठी २ पथक, कळंबोलीसाठी २ पथक, पनवेल आणि नवीन पनवेलसाठी प्रत्येकी १ पथक तयार करण्यात आले आहे. या प्रत्येक पथकामध्ये १  महापालिका कर्मचारी, दोन निवृत्त अधिकारी, १ सिक्युरीटी गार्ड, १ कॅमेरामॅन असे ५ सदस्य  आहेत.

मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी महापालिका द्वारे महापालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’  मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्ता कर वसुलीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका द्वारे करण्यात आले आहे. मालमत्ता कर न भरल्यास नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणावरती बंदी येणार आहे. तसेच मालमत्ता कराचा बोजा मालमत्तेवरती चढविला जाणार आहे. याशिवाय स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनावे. - गणेश देशमुख,  आयुक्त -  पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महावितरण'चा अजब कारभार