बाप्पाच्या आगमनासाठी ढोल ताशा पथकांचा सराव

नवी मुंबई शहरात मैदानांची कमतरता

वाशी : महाराष्ट्रात कुठलाही सण असला की वाद्य म्हणून ढोल ताशा पथकाला अधिक पसंती असते. तर सर्वात जास्त मागणी  गणेशोत्सवात असते. मात्र, यंदा अधिक श्रावण मास असल्याने लाडक्या बाप्पाचे आगमन उशीराने होणार आहे. परंतु, श्रीगणरायाचे आगमन यंदा उशीराने होणार असले तरी ढोल ताशांची वाढती मागणी पाहता या पथकांनी आतापासूनच सरावाला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक वारसा लाभल्याने प्रत्येक सण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी महाराष्ट्रात शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव सण ढोल ताशांच्या गजरा खेरीज कधी साजरे होत नसत. मात्र, हळूहळू या ढोल ताशांची जागा ‘डीजे'नी घ्ोतली. परिणामी ढोल ताशा पथकांना उतरती कला लागली. मात्र, ‘डीजे'च्या कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना खूप त्रास होऊ लागला. शेवटी न्यायालयाने डीजेवर बंदी घातली. त्यानंतर पुन्हा डीजेची जागा ढोल ताशा पथकांनी घेतली. न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशा पथकांना मागील पाच-सहा वर्षात पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात, शोभायात्रांत ढोल ताशा पथकांना दरवर्षी मागणी वाढल्याने नवी मुंबई शहरात ढोल ताशा पथकांची संख्या वाढू लागली आहे. आता या ढोल ताशा पथकात महिला, तरुणी देखील सामील होत आहेत.

सन २०२० आणि २०२१ मध्ये कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे सणांवर निर्बंध लादल्याने ढोल ताशा पथकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, मागील वर्षीपासून सर्व निर्बंध उठल्याने ढोल ताशा पथक व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. एका ढोल ताशा पथकात किमान ५० ते २०० वादक असतात. ढोल ताशांचा दर तासावर ठरत असून, तासाला किमान १० हजार ते २५ हजार दर आकारला जातो, अशी माहिती ढोल ताशा वादकांनी दिली.

नोकरी व्यवसाय सांभाळून सराव
ढोल ताशा वादन हंगामी व्यवसाय आहे. त्यामुळे ढोल ताशा पथकांत बरेच वादक नोकरी, व्यवसाय करणारेच असतात. परिणामी आगामी सण पाहता ढोल ताशा वादन सरावासाठी सुट्टीच्या दिवसावर भर दिला जात आहे.

सरावासाठी मैदानाची कमतरता
ढोल ताशा वादकांना सरावासाठी मोठी जागा लागते. मात्र, नवी मुंबई शहरात मैदानांची कमतरता आहे. तर काही मैदाने शाळांच्या ताब्यात असल्याने जागेची कमतरता भासते. त्यामुळे ढोल ताशा पथकांनी उड्डाणपुलांचा आसरा घेत आपला सराव सुरु ठेवला आहे.

मार्च २०२० पासून सलग दोन वर्ष ‘कोविड'मुळे राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मनाई केल्याने गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे ढोल ताशा पथकांच्या उत्पन्नावर पाणी फेरले होते. मात्र, मागील वर्षीपासून राज्य शासनाने सणांवरील निर्बंध हटवल्याने ढोल ताशांना सुपाऱ्या येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ढोल ताशा पथकांनी गणरायाच्या स्वागतासाठी आतापासूनच सरावाला सुरुवात केली आहे. - ओमकार शिंदे, वादक - नादब्रम्ह ढोल-ताशा पथक. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीहरी पवळे यांचा सन्मान