लसीकरण ऑनलाईन नोंदीसाठी ‘यु-विन पोर्टल'ची निर्मिती

‘यु-विन पोर्टल' सुरु करण्यासाठी नवी मुंबई महापालिका पुन्हा एक पाऊल पुढे!

नवी मुंबई : नियमित लसीकरणात नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा आणि लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता योग्य खबरदारी घत आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सिटी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीच्या दर महिन्याला बैठक होऊन आढावा घेतला जात असतो.

या लसीकरण कार्यवाहीत अधिक सुधारणा करीत भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ ऑगस्ट २०२३ पासून संपूर्ण देशभरात ‘यु-विन (ळ-ेंघ्ऱ्) पोर्टल' सुरु केले जाणार आहे. यामुळे मुलांना लसीकरण करण्यासाठी पालकांना लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. तसेच माता-बाल संगोपन कार्ड जपूनही ठेवावे लागणार नाही. ‘यु-विन पोर्टल'वर मुलांसाठी सर्व प्रकारच्या लसी मिळविण्याबाबत संपूर्ण माहिती असेल. महत्वाचे म्हणजे आपल्या निवासी जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्हा किंवा राज्यातील रुग्णालयात पाहिले जाऊ शकते.

प्रत्येक बालकाचे लसीकरण व्हावे आणि बाळाचे आरोग्य रक्षण व्हावे याविषयी शासन अत्यंत सतर्क असून लसीकरणाकडे विशेष लक्ष देत आहे. या ‘यु-विन पोर्टल'ची संपूर्ण माहिती होण्याकरिता शासनाच्या वतीने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

अशाच प्रकारचे ‘यु-विन पोर्टल' विषयक विशेष प्रशिक्षण सत्र नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण सत्रात ‘यु-विन पोर्टल'च्या जिल्हा समन्वयक शेफाली गडपायले यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, एल.एच.व्ही आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना ‘यु-विन पोर्टल' विषयी सविस्तर माहिती देत प्रशिक्षित केले.

ऑनलाईन रेकॉर्ड उपलब्धता...
‘यु-विन पोर्टल'वरुन गरोदर माता आणि बाळाची लसीकरणासाठी नोंद ऑनलाईन उपलब्ध होईल. सदर रेकॉर्ड ‘यु-विन पोर्टल'द्वारे ठेवला जाईल. विशेष बाब म्हणजे यु-विन पोर्टल अंतर्गत लाभार्थ्यांच्या लसींची रिअल-टाइम एन्ट्री केली जाईल. या पोर्टलवर गरोदर माता आणि मुलाची नोंदणी केली जाईल. सदर पोर्टल कोरोनाकाळात लसीकरणासाठी असलेल्या को-विन पोर्टल प्रमाणेच काम करेल. ‘यु-विन पोर्टल' आधारकार्डशी लिंक केले जाईल. यानुसार प्रसुतीनंतरही माता आणि बाळाच्या लसीकरणाची नोंद आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पोर्टलवर ऑनलाईन होत राहील. प्रत्येक मुलासाठी एक युनिक आयडी तयार केला जाईल.

मोबाईलवर संदेश...
 कोरोनाच्या काळात लसीकरणानंतर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येत होता. त्याच धर्तीवर या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईल नंबरवर ‘यु-विन पोर्टल'द्वारे संदेश येईल आणि लसीकरणाशी संबंधित सर्व तपशील ‘यु-विन पोर्टल'वर नोंद केली जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे लाभार्थ्याला कोणत्याही राज्यात आणि जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. पोर्टलवर एका क्लिकद्वारे लसीकरणाचा तपशील समजेल.

महापालिका मुख्यालयातील या प्रशिक्षणानंतर २० जुलै पर्यंत महापालिकेची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये ए.एन.एम. यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याच पध्दतीने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३० जुलै पर्यंत आशा स्वयंसेविका आणि इतर कर्मचारी यांचेही प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे.

अशाप्रकारे ‘यु-विन पोर्टल'द्वारे लसीकरणाला नियोजनबध्दता येणार असून पालकांना लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचा ताण घेण्याची गरज भासणार नसून राज्यात कुठेही लसीकरण करुन घेता येईल. याबाबतचे प्रशिक्षण शासनामार्फत दिले जात असून प्रत्येक कामात पुढे असणारी नवी मुंबई महापालिका याही बाबतीत आघाडीवर आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बाप्पाच्या आगमनासाठी ढोल ताशा पथकांचा सराव