महापालिकेच्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद

अवघ्या दोन दिवसात साडेचार हजारांहून अधिक अर्ज भरले

पनवेल: पनवेल महापालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक  गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार बुधवार दिनांक १३ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करून गट'अ' ते गट 'ड' मधील ३७७ रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसात साडेचार हजारांहून अधिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेचे अर्ज भरले आहेत.

ही भरती प्रक्रिया पारदर्शी होणार आहे. यामध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील पदांकरिता ही भरती होणार आहे. तुलनात्मक स्पर्धेतून निवड प्रक्रिया होण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना  www.panvelcorporation.comhttps://mahadma.maharashtra.gov.inhttps://mahadma. या संकेतस्थळांवर १७ ऑगस्टपर्यंत रात्री ११:५५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेल व एसएमएसव्दारे कळविण्यात येणार आहे.उमेदवारांना १३ जुलै ते १७ ऑगस्ट यादरम्यान उमेदवारांना त्यांचे अर्ज भरता येणार आहेत.

महानगरपालिकेची भरती प्रक्रिया संबंधात उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. सदर कक्षामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिनांक १३ जुलै ते दिनांक१७ ऑगस्ट या कालावधीकरीता नेमणुक करण्यात आली आहे. उमेदवारांना भरती प्रक्रिया संदर्भात काही अडचण असल्यास ०२२-२७४५८०४२, २७४५८०४१ या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन मुख्यालय उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संर्वर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सध्या पनवेल महानगरपालिकेची ३७७ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून,कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने ,पदाधिका-याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांचे विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करावी . परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. -  गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लसीकरण ऑनलाईन नोंदीसाठी ‘यु-विन पोर्टल'ची निर्मिती