जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्यामध्ये तुटवडा
नवी मुंबई मधील नागरिक त्रस्त
तुर्भे :नवी मुंबई शहरात मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक कारणामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीद्वारे ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. यासंदर्भात दोन आठवडयापूर्वीच कंपनीद्वारे जनतेला काही प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर सेवा पुरवण्यात असुविधा निर्माण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ग्राहकांकडून त्याकडे लक्ष दिले गेले नाही. घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यास २ दिवसांत तो मिळण्याची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. त्या सवयीनुसार सिलेंडरची नोंदणी केल्यावर २ दिवसांत सिलेंडर आला नाही. दोन दिवसाचे ५ दिवस झाले तरी सिलेंडर न आल्याने जनतेची एकच तारांबळ उडाली. जो तो सिलेंडरची गाडी कधी येते याची वाट पाहू लागला. अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी रांग लागली. १० दिवसापूर्वी नोंदणी केलेल्याना सिलेंडर न देता एका दिवसापूर्वी नोंदणी केलेल्याना सिलेंडर दिला जात असल्याचा आरोप काही गृहिणीनी केला आहे.
दरम्यान, कंपनीच्या सिस्टीम मधील माहिती अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे सध्या जिथे दररोज ३ गाड्या सिलेंडरची मागणी आहे तिथे केवळ १ गाडीच मिळत आहे. माहिती अद्ययावत होताच लवकरच घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल. तसेच नोंदणीच्या क्रमांकानुसार ग्राहकांना सिलेंडर दिला जात आहे, असे ‘अष्टिनायक गॅस एजन्सी'चे संचालक डॉ. निलेश पारचाके यांनी स्पष्ट केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन आठवड्यापासून विविध गॅस एजन्सीला त्यांच्या मागणीनुसार घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा होत नाही. अनेक ग्राहक नेहमीच्या सवयीप्रमाणे गॅस सिलेंडरची गाडी आल्यावर त्या ठिकाणी जाऊन बुकिंग करतात आणि त्यानंतर त्यांना त्वरित सिलेंडर दिला जातो किंवा त्याच दिवशी दिला जातो, अशी प्रक्रिया काही ठिकाणी राबवली जात होती. परंतु, माहिती अद्ययावत करताना ग्राहकांची आगाऊ नोंदणी झालेल्या प्रमाणातही घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा होत नव्हता. परिणामी तात्काळ बुकिंग नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांना कंपनीने दिलेल्या संपर्क क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा संपर्क करुन गॅसची आगाऊ नोंदणी केली, तर योग्य प्रमाणात नोंदणी कंपनीला प्राप्त होऊन सिलेंडरचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.