वाहन चालकांच्या त्रासात आणखी भर

ठाणे-बेलापूर मार्गालगत कासव गतीने गटाराचे काम

वाशी : ठाणे-बेलापूर मार्गालगत महापे उड्डाणपूल ते कोपरखैरणे उड्डाणपूल दरम्यान समांतर रस्त्यावर गटाराचे काम सुरु आहे. मात्र, सदर काम अतिशय संथगतीने सुरु असल्याने या कामासाठी मागील चार महिन्यांपासून महापे उड्डाणपूल ते कोपरखैरणे उड्डाणपूल समांतर रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रशासकिय राजवटीत नवी मुंबई महापालिका स्थापत्य विभागाने कामांचा धडाका लावला आहे. नवी मुंबई शहरात चौक, गटार, रस्ता अशी मोठ-मोठी कामे केली जात आहेत. मात्र, सदर कामे करताना बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळयात देखील चौक, गटार, रस्ता आदी कामे सुरुच ठेवल्याने वाहन चालकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.

महापे येथील समांतर रस्त्यावरील गटाराचे काम महापालिका द्वारे हाती घेण्यात आले आहे. मात्र, सदर काम करताना महापे येथील समांतर रस्ता मागील चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या महापे गाव, हनुमान नगर मधील नागरिकांना तसेच महापे येथील हॉटेल व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिशय संथ गतीने सुरु असलेल्या महापे येथील समांतर रस्त्यावरील गटाराच्या कामात महापालिका स्थापत्य विभागाने गतीमानता आणत सदर काम लवकर पूर्ण करुन वाहन चालकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी महापे गावातील सामाजिक कार्यकर्ते महेश डाऊरकर यांनी केली आहे. याबाबत ठाणे-बेलापूर मार्ग कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद लाभला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी आरटीओ तर्फे गेल्या ८ दिवसांपासून मोहिम