शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण
आपला दवाखना व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात ‘आपला दवाखाना’ तसेच पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लवकरच तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये भिषक (एमडी फिजीशियन), बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, यांच्या सेवा आठवड्यातून एक दिवस तर त्वचारोग तज्ज्ञ , नेत्ररोग तज्ज्ञ, कान –घसा- नाक तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ यांच्या पंधरा दिवसातून एकदा सेवा देण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरिक दिवसभर काम करून संध्याकाळी दवाखान्यात येत असतात, हे लक्षात घेऊन महापालिकेने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळच्या ओपीडीबरेाबरच दुपारी 2 ते रात्री 10.00वाजेपर्यंत ओपीडी सुरू करुन आरोग्य सेवा देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. याबरोबरच महापालिकेने वैद्यकिय आरोग्य सेवा बळकट करत पुढचे पाऊल टाकले आहे. लवकरच खारघर येथील आपला दवाखना व महापालिका क्षेत्रातील गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, आणि कळंबोली, खारघर, कामोठे, पालेखुर्द येथील आरोग्य वर्धिनी केंद्र याठिकाणी संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत सात प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये भिषक (एमडी फिजीशियन), बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, यांच्या सेवा आठवड्यातून एकदा तर त्वचारोग , नेत्ररोग, कान –घसा- नाक तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ यांच्या पंधरा दिवसातून एकदा सेवा दिल्या जाणार आहेत. या सेवा सुरू झाल्यानंतर याची माहिती प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिध्द करण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिका पायाभूत सुविधांमध्ये वैद्यकियआरोग्य सेवांवरती भर देत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा या सकाळी 10- रात्री 10 वाजेपर्यत सुरू केल्या आहेत. याचबरोबरीने लवकरच पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध सात प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांच्या सेवेत रूजू होणार आहेत. नागरिकांनी या सेवेचा आवश्य लाभ घ्यावा. – गणेश देशमुख , आयुक्त पनवेल महानगरपालिका
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, या हवामानांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गरज पडल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 10-2 व दुपारी 2-10 यावेळेत जाऊन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुमारे 40 प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जात असून याचा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. महापालिका आरोग्य सेवांमध्ये वाढ करत असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा लवकरच सुरूवात करणार आहे. - डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी