उद्यानांच्या सुधारणांकरिता महापालिका आयुवतांचा ॲक्शन प्लॅन

उद्यानांचे शहर असा ‘नवी मुंबई'ची अशी ओळख टिकविण्यासाठी उद्यान विभागाने दक्ष रहावे -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई : स्वच्छ आणि सुंदर शहराप्रमाणेच ‘उद्यानांचे शहर (Garden City)' अशी नवी मुंबईची एक वेगळी ओळख असून १०९ चौरस कि.मी. महापालिका क्षेत्रात २२५ हुन अधिक उद्याने आणि सुशोभित जागा नवी मुंबईत आहेत. नवी मुंबईतील अनेक उद्याने विशिष्ट संकल्पना घेऊन ‘थीम पार्क' म्हणून महापालिकेने विकसित केली असून त्यामध्ये बेंचेस, कारंजे, खेळणी अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे केवळ नवी मुंबईकर नागरिकांचीच नाही तर नवी मुंबईला भेट देणाऱ्या इतर शहरातील नागरिकांचीही पसंती या उद्यानांना मिळत आहे.

विरंगुळ्याची आकर्षक ठिकाणे म्हणून प्रसिध्द असलेल्या नवी मुंबईतील उद्यानांची वैशिष्ट्यपूर्णता टिकून रहावी याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर अत्यंत दक्ष आहेत. या उद्यानांची स्थिती उत्तम रहावी यादृष्टीने उद्यान विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यांची संयुक्त बैठक घेत आयुक्त नार्वेकर यांनी दोन्ही विभागांनी परस्पर समन्वयाने उद्याने अधिक उत्तम होण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पावसाळी कालावधीत उद्यानांची विशेष दक्षता घेण्याची गरज विशद करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी देखभाल- दुरुस्तीची कार्यवाही अधिक काटेकोर करावी आणि संबंधित कंत्राटदारांना सतर्क राहण्याचे निर्देश द्यावेत, अशा सूचना दिल्या. अशाच प्रकारे खेळणी दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागाकरता वेगळे वार्षिक कंत्राट करुन खेळणे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते त्वरित दुरुस्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच उद्यानांमधील ओपन जीमच्या दुरुस्तीबाबतही दक्षता घेण्यात यावी. उद्यानांमधील टॉय ट्रेन कार्यान्वित करावी, अशा सूचना आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानांमधील आवश्यक स्थापत्य, पाणी पुरवठा आणि विद्युत विषयक कामे विहित वेळेत तत्परतेने होण्याच्या दृष्टीने अभियांत्रिकी विभागाने अधिक बारकाईने लक्ष द्यावे. सदर कामे जलद होण्याकरिता उद्यानांच्या देखभाल-दुरुस्ती कामांवर लक्ष ठेवण्यासाठी २ कनिष्ठ अभियंता स्वतंत्रपणे याच कामासाठी नेमावेत, असे आयुक्तांनी निर्देशित केले.

प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्ये असतात. त्या वैशिष्ट्यांमुळेच शहराच्या नावलौकिकात भर पडत असते. नवी मुंबईतील सर्वच उद्याने नागरिकांची आकर्षण केंद्रे असून सदरचा नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी उद्यान विभागाने दक्षतेने कार्यरत राहणे गरजेचे आहे. मँगो गार्डन, रॉक गार्डन अशा काही उद्यानांमध्ये रेस्टॉरंट सुरु असून या रेस्टॉरंटची वेळ उद्यानांच्या वेळेइतकीच मर्यादित असावी. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण येथे