मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत गोदामांवर ‘नैना'ची कारवाई

सिडको'च्या नैना प्राधिकरण विभागाकडून मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत गोदामांवर कारवाईचा बुलडोझर

उरण : सिडको'च्या नैना प्राधिकरण विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतल्याने मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील गोदामांवर नैना प्राधिकरण (अतिक्रमण) विभागाने ११ जुलै रोजी कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे.

‘सिडको'च्या नैना प्राधिकरण (अतिक्रमण) विभागाने या अगोदर जासई, वेश्वी, विंधणे, सारडे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत गोदामांच्या आणि इमारतीच्या बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला होता. यानंतर देखील उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, मोठी जुई, चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा, पिरकोण, सारडे ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक ग्रामपंचायत, तहसील कार्यालय-उरण, वन विभाग, कस्टम, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच ‘सिडको'च्या काही अधिकारी वर्गाना हाताशी धरुन गोदाम व्यवस्थापक, मालक यांनी गोदामांची, इमारतीचे बांधकाम सुरु केल्याचे चित्र राजरोसपणे पहावयास मिळत होतेे.

उरण तालुक्यातील मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे गट क्रमांक १६७/१ या जागेवर कलीम बिन्ना शाह आणि आरीफ बिन्ना शाह या व्यावसायिकांनी नैना प्राधिकरण विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोदामांचे बांधकाम उभे केले होते. या संदर्भात नैना प्राधिकरण (अतिक्रमण) विभागाकडे तक्रार दाखल होताच नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाकडून कलीम बिन्ना शाह आणि आरीफ बिन्ना शाह या व्यवसायिकांना महाराष्ट्र प्रादेशिक-नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम क्रमांक ५४ (१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, सदर व्यवसायिकांनी योग्य ती कागदपत्रांची पूर्तता सादर न केल्याने सदर गोदामे पोलीस फौजफाट्यासह ११ जुलै रोजी जमीनदोस्त करण्यात आले.

याप्रसंगी नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ अभियंता नवनीत सोनावणे, प्रताप नलावडे, सागर महिंद्र, प्रमोद पाटील, आदि अधिकारी उपस्थित होते. तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्यानांच्या सुधारणांकरिता महापालिका आयुवतांचा ॲक्शन प्लॅन