कोपरखैरणे विभागात विनापरवाना वृक्षतोडीचे सत्र कायम?

महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर संशय

वाशी : नवी मुंबई शहरात बेसुमार अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामे सुरु असताना बांधकामात अडथळा ठरत असलेली झाडे विनापरवाना तोडली जात आहेत. कोपरखैरणे येथेही बेकायदा बांधकामात अडथळा ठरत असलेली झाडे विनापरवाना तोडली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, अवैध वृक्षतोडीवर कारवाई करण्यास नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग हात आखडता घेत असल्याने नवी मुंबई शहरात अवैध वृक्षतोडीचे सत्र कायम आहे.

राज्यातील अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल कायम राखावा म्हणून सरकारने २०२१ मध्ये वृक्ष संवर्धन कायद्यात सुधारणा करुन वृक्ष संवर्धन कायदा अधिक कडक केला आहे. मात्र, वृक्ष संवर्धन कायद्यात तरतूद करुन देखील महापालिका उद्यान विभागातील काही अधिकाऱ्यांच्या ज्ञानात अजूनही प्रकाश पडत नसल्याचे नवी मुंबई शहरातील अवैध वृक्षतोडीवरुन दिसून येत आहे. नवी मुंबई शहरात आजही मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून, या वृक्षतोडीला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु आहे. कोपरखैरणे येथील एका आरक्षित भुखंडावर बांधकाम सुरु आहे. तत्कालीन कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे यांनी सदर बांधकाम अनधिकृत असल्याने सप्टेंबर-२०२२ मध्ये या बांधकामावर तोडक कारवाई केली होती. मात्र, त्यांची बदली होताच नवीन कोपरखैरणे विभाग अधिकाऱ्यांनी सदर बेकायदा बांधकाम करणाऱ्या विकासकावर सागराएवढे प्रेम दाखवल्याने सदर  बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. सदर बांधकामास बांधकाम परवानगी दिली आहे का?, अशी कोपरखैरणे अतिक्रमण विभागात विचारणा केली असता माहिती घेऊन कळवतो, असे उत्तर देण्यात आले. मात्र, सदर बेकायदा बांधकाम सुरु असताना येथील पुरातन वृक्षांची सरसकट कत्तल करण्यात आली आहे. कोपरखैरणे विभागात यापूर्वीही विनापरवाना वृक्षतोड केल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या असून देखील महापालिका उद्यान विभाग कारवाई करत नसल्याने महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर आता पर्यावरण प्रेमींकडून संशय व्यक्त केला जात आहे.

कोपरखैरणे सेक्टर-४ मधील वृक्षतोडी बाबत कोपरखैरणे विभाग अधिकाऱ्यांना चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले आहे. - दिलीप नेरकर, उपायुक्त (उद्यान विभाग) - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय मध्ये बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी