'सिडको'चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांचा सत्कार

नवी मुंबई : ‘सिडको'मधील अधिकारी-कर्मचारी यांचे ७ जुलै रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाप्रसंगी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, शान्तनु गोयल, डॉ. कैलास शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस जे. टी. पाटील, ‘सिडको बी. सी. एम्लॉईज असोसिएशन'चे अध्यक्ष नरेंद्र हिरे, अध्यक्ष, सरचिटणीस नितीन कांबळे तसेच ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसहित मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

स्नेहसंमेलन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन झाली. कर्मचाऱ्यांना विरंगुळ्याचे काही क्षण मिळावेत आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळून पुढील वर्षभरासाठी त्यांना सकारात्मक उर्जा प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने सदर स्नेहसंमेलन उपयुक्त ठरते, असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच दक्षिण आफ्रिकेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पीटरमारटीझबर्ग ते डरबन या दोन शहरांदरम्यानचे ८७.७ कि.मी. अंतर केवळ ११.०७ तासांत धावून पूर्ण करत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविणारे ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर मुख्य भूमी-भूमापन अधिकारी सतिशकुमार खडके यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती झाल्याने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक आणि सामुहिक क्रीडा स्पर्धांमधील तसेच सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकही प्रदान करण्यात आले.

दरम्यान, प्रमुख कार्यक्रम पार पडल्यांनतर ‘सिडको आर्टिस्ट कम्बाईन ग्रुप'तर्फे सादर करण्यात आलेल्या गाण्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या संतोष पवार लिखित व दिग्दर्शित ‘यदा कदाचित रिटर्न्स'या विनोदी नाटकानेही उपस्थितांची दाद मिळवली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

५०० अवयव प्रत्यारोपीत करणारे अपोलो एकमेव रुग्णालय