‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे वृक्षारोपण

नवी मुंबई : ‘सिडको'च्या वृक्षारोपण मोहिमेचा ७ जुलै रोजी खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यंदा नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी मिळून ४० हजार इतक्या विक्रमी संख्येने वृक्षांची लागवड करण्याचे ‘सिडको'चे लक्ष्य आहे.

वृक्षारोपणाच्या सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, शान्तनु गोयल, डॉ. कैलास शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्यासह ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सिडको'ने नवी मुंबईतील पर्यावरण संरक्षण-संवर्धनास नेहमीच प्राधान्य दिले असून, पर्यावरण संवर्धनाकरिता ‘सिडको'तर्फे नवी मुंबईतील विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ‘सिडको'तर्फे पर्यावरणाचा समतोल राखत विकास केला जात आहे. वृक्षारोपण उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील खारघर, कामोठे, नावडे, उलवे, द्रोणागिरी आदि नोडमध्ये सुरु, कांचन, ताम्हण, कडुलिंब, बहावा, करंज, कदंब, बकुळ, सिता अशोक, पुत्रंजिवा, वड, पिंपळ, उंबर आदि प्रजातींच्या ४० हजार वृक्षांची लागवड ‘सिडको'तर्फे करण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळी कालावधीत रस्ते दुरुस्तीसाठी नवी मुंबई पालिका विशेष दक्ष