वाशीत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुवती जनजागृती कार्यक्रम संपन्न

व्यसन २५ वर्षांच्या आत लागले तर सोडवणे कठीण -डॉ. ओंकार माटे  

नवी मुंबई ः अंमली पदार्थांच्या सेवनामुळे विचार, भावना आणि वर्तणूक संबंधी मेंदूच्या कार्यात बदल होत जातो आणि तल्लफ आली की कोणत्याही परिस्थितीत ती तल्लफ अंमली पदार्थांचे सेवन करुन भागवण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे तरुणांनी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला मानसोपचार तज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी वाशीमध्ये विद्यार्थ्यांना दिला.  

‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन'चे औचित्य साधून ५ जुलै रोजी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, मराठी साहित्य संस्कृती-कला मंडळ तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अंमली पदार्थ विरोधी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. आंेकार माटे संवादक म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. माटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी ‘वाशी पोलीस ठाणेे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चांदेकर, ‘अन्वय व्यसनमुक्ती केंद्र'चे संचालक डॉ. अजित मगदूम, ‘मराठी साहित्य, संस्कृती-कला मंडळ'चे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, ‘नशाबंदी मंडळ'चे मिलिंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर सोनटक्के, कवी वैभव वऱ्हाडी, आदि उपस्थित होते.  

कोणतेही व्यसन वयाच्या २५ वर्षाच्या आत लागले, तर ते सोडवणे अतिशय गुंतागुंतीचे होते. मात्र, ३५ वर्षानंतर जर व्यसन लागले तर ते सोडवणे तितके गुंतागुंतीचे होत नसल्याचे डॉ. आंेकार माटे यांनी स्पष्ट केले. आज जो तो अपेक्षित गोष्टी मिळवायच्या प्रयत्नात आहे. मात्र, आपल्या आवाक्याबाहेरची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ताणतणाव, निराशा येते. परिणामी, तरुणाई व्यसनांकडे वळते असल्याचे सांगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर अशा घटनांमध्ये पोलिसांना कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागत असल्याचे स्पष्ट केले.  

यावेळी डॉ. अजित मगदूम यांनी अंमली पदार्थांच्या समस्येला आंतरराष्ट्रीय कनेक्शन कसे कारणीभूत आहे, तेे सांगत विद्यार्थ्यांनी मोकळा वेळ व्यायाम, मैदानी खेळ, ट्रेकींग, संगीत, कला यामध्ये स्वतःला गुंतवून व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमात अन्वय प्रतिष्ठान आणि के. जे. सोमय्या कॉलेज यांच्या विद्यमाने आयोजित पोस्टर मेकींग स्पर्धेचे तसेच अन्य स्पर्धेचे निकाल जाहिर करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आयसीएल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा एकच प्याला पथनाट्य सादर केले. प्रा.वृषाली मगदूम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मुक्ता महापात्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ