वृक्षांची संख्या वाढण्यास उपयुवत ठरणारे बीज मोदक

माझी वसुंधरा अभियानांतर्गत निर्मित बीज मोदकाच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्याचे आवाहन

नवी मुंबई : नाका कामगारांसाठी कार्यरत असणाऱ्या प्रभात संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी महिलांना काम मिळावे यासाठी बिगारी काम करणाऱ्या महिलांना बीज मोदक निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमातून महिला सक्षमीकरण व निसर्ग संवर्धन हे दोन्ही हेतू साध्य होत आहे. १ ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या वन महोत्सवानिमित्त वृक्ष लागवडीचा श्री गणेशा करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.

दहा रुपये प्रति मोदक उपलब्ध असणारे हे बीज मोदक सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना, विविध संस्थातील सदस्यांना,  कंपनीतील  कर्मचाऱ्यांना, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, परिवारातील सदस्यांना भेट देता येण्यासारखे आहेत. वाढदिवसानिमित्त रिटर्न गिपट म्हणूनही देऊ शकता येतील. या उन्हाळ्यात आपण उच्चांकी तापमानाबरोबरच अवकाळी पाऊस असे बदलते निसर्गचक्र अनुभवले आहे. त्यामुळे विविध समाजमाध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा होताना दिसते. ग्लोबल वॉर्मिंग हा ग्लोबल प्रश्न आहे; त्यामध्ये आपला काय संबंध, अशा अविर्भावात आपण सद्य परिस्थितीचा दोष अमर्याद वृक्षतोड, प्रदूषण, आधुनिकीकरण, ग्रीन हाऊस, एसीचा वापर इत्यादींवर देऊन मोकळे होतो. पण आता निसर्ग संवर्धनासाठी स्वतःपासूनच श्रीगणेशा करण्याची.. यासाठी प्रभातने हे बीज मोदक आणले आहेत. देश विदेशात सीडबॉलचा यशस्वी प्रयोग  करण्यात आला आहे. यामध्ये वृक्ष लागवडीसाठी बीज असलेले मातीचे गोळे तयार करण्यात येतात. या संकल्पनेत जांभूळ, निम, करंज, बबूळ, आरगवध, एरंड, गुंजा इत्यादी बियांवर नैसर्गिक बीज प्रक्रिया करून शेण तसेच सेंद्रिय खते व मातीचा वापर करून मोदकाच्या आकाराचा बीजांनी युक्त असा बीज मोदक तयार करताना तो टाकल्यावर सहज फुटू नये यासाठी रोल बँडेजचा कल्पकतापूर्वक वापर करण्यात आलेला आहे. जंगलांमध्येही झाडांची संख्या कमी होत आहे अशा ठिकाणी ट्रेकिंगला गेल्यावर भटकंती करता करता नदीनाल्यांच्या किनारी, डोंगरदऱ्यात बीज मोदक रोपण केल्यास वृक्षांची संख्या वाढण्यास हातभार लागेल. या उपक्रमासाठी वृक्षमित्र जीवन निकम हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९६१९७४६५३१/९८६९४३२२२४  या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

50 वर्षांवरील ज्येष्ठांना दिलासा