धोकादायक इमारती मधील रहिवाशांचा जीव टांगणीला

नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारती मधील रहिवाशांचा जीव टांगणीला

वाशी : नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतीच्या घरांमधील छताचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. मात्र, ऐन पावसाळ्यात या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश आल्याने पर्यायी जागेसाठी रहिवाशांची धावाधाव सुरु आहे. तर पैशाअभावी काही रहिवासी आपला जीव मुठीत धरुन अशा धोकाकदायक इमारतीत राहत आहेत. त्यामुळे महापालिका किंवा सिडको यांनी अशा रहिवाशांची राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दरवर्षी पावसाळा पूर्व महापालिका धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करते. यंदाही महापालिकेने ५२४ इमारती धोकादायक घोषित केल्या असून त्यातील ६१ इमारती अतिधोकादायक (सी-वन) श्रेणीत मोडणाऱ्या आहेत. मात्र, महापालिका धोकादायक इमारती जाहीर करत असताना अशा इमारतीतील रहिवाांसाठी प्रशासनाने आजतागायत संक्रमण शिबिराची व्यवस्था केली नाही. शहरातील घर भाडे पाहता नागरिक अशाच इमारतीत आपला जीव मुठीत धरुन राहत आहेत.

मागील एक आठवडा नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून धोकादायक इमारतींच्या घरातील छताचे प्लास्टर पडत आहेत. नेरुळ मध्ये अशा ४ ते  ५ घटना घडल्या आहेत. त्यामुळे सदर इमारतींची पाहणी करुन त्याचा तात्काळ वापर थांबवण्यास महापालिकेने आदेश दिले आहेत. मात्र, नवी मुंबई शहरातील अवाजवी घरभाडे पाहता सर्वच रहिवाशांना येथील घरभाडे परवडत नसल्याने ते आपला जीव मुठीत धरुन धोकादायक इमारतींमध्ये रहात आहेत. त्यामुळे महापालिका किंवा सिडको यांनी अशा रहिवाशांची राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. आता भर पावसात नेरुळ मधील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अशा इमारतींमधील रहिवाशांठी महापालिकेने आजतागायत संक्रमण शिबीरे बांधली नाहीत. त्यामुळे महापालिकेने अशा रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था उभी केली पाहिजे.
-विशाल विचारे, शाखाप्रमुख-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), सीवुडस्‌. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महानगरपालिकेने ३ महिन्यांत १३५ कोटी