‘ति'च्या झुंजीला आगरी-कोळी कलाकारांचा आधार

प्रीती प्रवीण पाटील यांची हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज

वाशी : पनवेल-जेएनपीटी मार्गावर १७ जून रोजी दोन कारची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात स्वतःचे संपूर्ण कुटुंब गमावून बसलेल्या प्रीती प्रवीण पाटील यांची ओपोलो हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज सुरु आहे. मात्र, त्यांच्या उपचाराखातर आर्थिक पाठबळ कमी पडत असून, समाजातून मदतीचा ओघ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून आगरी-कोळी कलाकार सरसावले असून, त्यांनी प्रीती प्रवीण पाटील यांच्या मदतीसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन १ लाख ३० हजार रुपयांची मदत केली आहे.

कोपरखैरणे गावात राहणारे प्रवीण पाटील आपल्या कुटुंबासोबत १७ जून रोजी जेजुरी दर्शनासाठी निघाले होते. मात्र, जेएनपीटी मार्गावर त्यांच्या वाहनाला एका इनोव्हा गाडीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात स्वतः प्रवीण पाटील, त्यांचा मुलगा सर्वम पाटील (वय-९) आणि सासरे नारायाण थोटे (वय-७१) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी प्रीती पाटील गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर बेलापूर मधील ओपोलो हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. प्रीती प्रवीण पाटील यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या अपघातात आपले पती आणि वडील असे दोन्ही गमावलेल्या प्रीती पाटील यांचा उपचार खर्च वाढत असून, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे प्रीती प्रवीण पाटील यांच्या उपचाखातर आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून समाजातील अनेक हात पुढे आले आहेत. आता प्रीती पाटील यांच्या मदतीसाठी आगरी-कोळी कलाकार देखील पुढे सरसावले आहेत. त्यासाठी ‘वीरभूमी एंटरटेंमेन्ट'चे निर्माता रोहन पाटील, नितेश म्हात्रे, वेदांत साऊंड आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा राखी पाटील यांच्या माध्यमातून ‘परंपरा आगरी-कोळ्यांची' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात ३० जून रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १ लाख ३० हजार रुपये जमा झाले असून, सदर रवकमेचा धनादेश प्रीती पाटील यांच्या उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कमी क्षेत्रफळ दाखवून मालमत्ता करात चोरी