पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेची बैठक

महापालिकेच्यावतीने चारही प्रभागातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचे आवाहन

पनवेल : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना विविध बदलांचा स्वीकार करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेने अश्वासक पाऊल उचलेले असून यासाठी मूर्तीदान, शाडू मूर्त्यांना पसंती देणे अशा अनेक उपायांचा अवलंब करावा लागणार असल्याची माहिती कैलास गावडे यांनी दिली.

आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळे, मूर्ती कारखानदार यांची बैठक दिनांक ३० जून रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहांमध्ये घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपायुक्त गणेश शेटे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अधिक्षक जयराम पादीर, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे, महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त कैलास गावडे यांनी पर्यावणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने केलेल्या तयारी विषयी माहिती देताना सांगितले, पर्यावणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीकरिता १ जुलैपासून सोशल मीडियावर जनजागृती करण्यात येणार आहे. याकरिता १ शॉर्ट फिल्म, १ जिंगल, आणि आयुक्त यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पालिकेतर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा व घरगुती गणेश सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात येणार आहे.

उपायुक्त गणेश शेटे यांनी यावेळी गणोशोत्सवासाठी महापालिका एक खिडकी योजना राबविणार असल्याचे सांगितले. गणोशोत्सवासाठी लागणारा परवाना यावर्षी ऑनलाईन पध्दतीने देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिकेच्यावतीने चारही प्रभागातील गणेश मंडळांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. सिडकोशी संबंधित गणेश मंडळाचे प्रश्न, महापालिका सिडकोशी समन्वय साधून सोडविल.त्यासाठी महापालिकेच्यावतीने येत्या काही दिवसांत पुन्हा गणेश मंडळांची बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

महापालिका माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' हा यातील एक महत्वाचा उपक्रम यावर्षी महापालिकेने हाती घेतला आहे. महापालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचे आवाहन केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ति'च्या झुंजीला आगरी-कोळी कलाकारांचा आधार