तुर्भे येथील सर्व्हिस रस्ता बनला नाला

महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचा विसर  

तुर्भे : तुर्भे ते वाशी लिंक रस्त्यालगतच्या तुर्भे येथील सर्व्हिस रस्त्यावर मागील ४ दिवसांपासून पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही त्याची नोंद घेण्यात आली नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

‘सिडको'ने वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट मधील वाहनांना तात्पुरत्या पार्किंगसाठी तुर्भे येथे मार्केटच्या चारही दिशांना सर्व्हिस रस्ता तयार केला आहे. तुर्भे स्मशानभूमी ते अरेंजा चौक येथपर्यंत तुर्भे ते वाशी लिंक रस्त्यालगत सदर सर्व्हिस रस्ता आहे. या रस्त्यालगत पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नैसर्गिक नाला तयार करण्यात आला आहे.

तुर्भे एमआयडीसीतून आलेल्या या नाल्यात डोंगराळ भागातून आलेले पावसाचे पाणी थेट वाशी खाडीत जाते. तुर्भे डेपो ते सिटी मॉल पर्यंतचा सदर नाला बंदिस्त करण्यात आला आहे. तुर्भे-वाशी रस्त्यावरील पावसाचे पाणी या नाल्यामध्ये जाणे अपेक्षित आहे. मात्र, या ठिकाणच्या नाल्यामध्ये पावसाळी पाणी वाहून नेण्याच्या मार्गिका चोकप झाल्या आहेत. या कारणामुळे या रस्त्यावरील पाणी नाल्यामध्ये जात नाही. परिणामी या परिसरात सर्व्हिस रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. या पाण्यात काहीजण घाण टाकत असल्याने काही दिवसांपासून साठून राहिलेले पाणी गढूळ झाले आहे. तसेच या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. या बाबत नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही त्यावर उपाययोजना करण्यात आली नाही.

याशिवाय तुर्भे मधील आयसीएल शाळा ते एपीएमसी सिग्नल पर्यंत रस्त्यावर ४ ठिकाणी तसेच माथाडी भवन ते सानपाडा महामार्गपर्यंत ३ ठिकाणी, एपीएमसी वाहतूक पोलीस चौकीच्या लगत कचऱ्याच्या कुंड्या ओसंडून वाहत आहेत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने पावसाच्या पाण्यात भीजल्याने येथे दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेची बैठक