पनवेल महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून जमीन मालकांची अडवणूक

संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश 

नवी मुंबई  पनवेल तालुक्यातील मौजे सोमाटणे येथील सर्व्हे नं.८ मधील जमिनीच्या फेरफार हरकती बाबतचा निर्णय जमीन मालकाच्या बाजुने झालेला असताना, पनवेल मधील महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी हरकतदाराला हाताशी धरुन त्याने केलेल्या जुन्या तक्रारी अर्जावर खाडाखोड करुन तो पुन्हा दाखल करुन घेत जमीन मालकाची अडवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जमीन मालक डॉ.जयंत भोईर यांनी याबाबत थेट महसूल मंत्र्यांकडे तक्रार करुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील सदर तक्रारीची दखल घेऊन संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल मध्ये राहणारे डॉ.जयंत भोईर यांनी सन २००७ मध्ये पनवेल तालुक्यातील मौजे सोमाटणे येथील सर्व्हे नं.८ मधील जमिनी खरेदी केल्या होत्या. त्याबाबतची हरकत फेरफार नोंद क.१४७४ करण्यात आली होती. त्यावेळी सदर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या अमृतराव जोशी आणि इतर यांनी त्याबाबत हरकत घेऊन सदर जागा आपली असल्याचा दावा करुन नायब तहसिलदारांकडे तक्रार दाखल केली होती. या फेरफार नोंदीचा अपिल जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सदर अपिलाचा निकाल २०१७ मध्ये डॉ.जयंत भोईर यांच्या बाजुने लागला. यानंतर सदर निकालाविरोधात जोशी आणि इतरांनी अपिल केले नाही. त्यामुळे डॉ. भोईर यांनी ६ जुलै २०२१ रोजी मनोहर शंकर पाटील यांना सदर जमिनी खरेदीखताने विक्री केल्या. त्यानंतर त्याची फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी १३ सप्टेंबर २०२१ रोजी महसूल विभागात कागदपत्रे दाखल केली. मात्र, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी १० महिने सदर फेरफारची नोंद मंजूर केली नाही. भोईर यांनी त्याबाबत चौकशी केली असता, सदरची नोंद नंतर मंजूर करण्यात येईल, असे तलाठ्यांकडून सांगण्यात आले. यानंतर अमृतराव जोशी यांनी पूर्वी केलेला जुन्या तक्रारी अर्जावर खाडाखोड करुन तो पुन्हा तलाठी मार्फत दाखल करुन घेण्यात आल्याचा आरोप डॉ.जयंत भोईर यांनी केला आहे.

सदर जमिनी बाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात झाला असल्याने तहसिलदाराने जोशी यांचा आलेला अर्ज फेटाळून त्याला दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागण्याबाबत सूचना करणे गरजेचे होते. मात्र, तहसलिदार यांनी जाणीवपूर्वक अमृतराव जोशी यांनी दाखल केलेला अर्ज स्विकारुन दावा चालवल्याचा आरोप डॉ.जयंत भोईर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या फेरफार क्र.१६०८ नोंदी संदर्भात तलाठीकडे १५ दिवसाच्या आत कोणतीही हरकत आलेली नसताना सदरची फेरफार नोंद क्र.१६०८ जाणूनबुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. 

तसेच जुन्याच सर्व्हे नंबरच्या हरकत अर्जावर नवीन फेरफार नंबर ओव्हररायटींग करुन सदरची बेकायदेशीर हरकत महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतःहून जाणूनबुजून स्वार्थापोटी दाखल करुन घेतल्याचे डॉ. जयंत भोईर यांनी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ‘पनवेल'चे तहसिलदार विजय तळेकर, नायब तहसिलदार लचके,  मंडळ अधिकारी सानप आणि तलाठी सचिन पवार यांनी हरकत घेणाऱ्या अमृतराव जोशी यांना हाताशी धरत त्यांच्याशी संगनमत करुन सदर सर्व प्रकार केल्याचा आरोप जयंत भोईर यांनी केला आहे. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित महसूल अधिकारी आणि यात सहभागी असलेल्या इतरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे येथील सर्व्हिस रस्ता बनला नाला