महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची सुस्ताई चव्हाट्यावर

नवी मुंबई मध्ये एका आठवड्यात ८८ झाडे जमीनदोस्त

वाशी : नवी मुंबई शहरात मागील एक आठवडा बरसत असलेल्या पावसामुळे एकूण ८८ झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र, नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाने वेळीच धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन त्यांची छाटणी केली असती तर यातील बहुतांश झाडे वाचवता आली असती, असे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले आहे.

महापालिका द्वारे एप्रिल आणि मे महिन्यात मान्सून पूर्व वृक्ष छाटणीला सुरुवात करण्यात येते. या दरम्यान धोकादायक वृक्षांची गणना करुन धोकादायक वृक्षांचीी यादी जाहीर करण्यात येते. मात्र, यंदा जून महिन्यातील पहिला आठवडा उलटल्यानंतर महापालिका उद्यान विभागाने फक्त वाशी विभागातील २६ धोकादायक झाडांची यादी घोषित केली होती. तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण नवी मुंबई शहरातील धोकादायक वृक्षांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून, १७३ झाडे धोकादायक घोषित करण्यात आली आहेत. मात्र, धोकादायक वृक्षांची यादी उशिरा जाहीर केल्याने त्याचा प्रत्यय मोठ्या प्रमाणात झाडे पडून आला आहे.

नवी मुंबई शहरात मागील एक आठवडा पावसाची संततधार सुरु असून, आतापर्यंत एकूण ५८६ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. या पावसात झाडांची मोठी पडझड झाली आहे. मागील २४ जून ते १ जुलै या दरम्यान पावसामुळे नवी मुंबई शहरात तब्बल ८८ झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची सुस्ताई आता झाडांच्या मुळांवर उठत असून, मागील वर्षीप्रमाणे वेळीच मान्सून पूर्व जर संपूर्ण वृक्ष सर्वेक्षण करुन छाटणी केली असती तर पडलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे वाचली असती, असे मत ‘पर्यावरण सेवा भावी संस्था'चे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कांदा बटाटा घेताय सावधान?