नंबर वनचा निश्चय करीत नवी मुंबईत विद्यार्थ्यांची स्वच्छता दिंडी

विठ्ठल नामासह स्वच्छतेचा गजर

नवी मुंबई : स्वच्छता कार्यामध्ये लोकसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यामध्ये नवी मुंबई महापालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये ‘आषाढी एकादशी'च्या पार्श्वभूमीवर बेलापूर विभागात करावे गांव परिसरात ‘स्वच्छता दिंडी'चे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई महापालिका आणि ‘ज्ञानदीप सेवा मंडळ'चे प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, करावे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘आषाढी एकादशी स्वच्छता दिंडी'मध्ये सहभागी २५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम' तसेच ‘विठ्ठल विठ्ठल  जय हरी विठ्ठल ' या नामघोषासह स्वच्छतेचे संदेश प्रसारित करीत ‘निश्चय केला, नंबर पहिला' घोषणेने परिसर दुमदुमून टाकला. शाळेच्या पटांगणापासून सुरु झालेली स्वच्छता दिंडी करावे, नेरुळ परिसरात साधारणतः दीड किलोमीटर फिरुन पुन्हा शाळा पटांगणात नामाचा गजर करीत परतली.

स्वच्छता आपल्या नवी मुंबई शहराची ओळख असून या नावलौकिकात येथील नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा फार मोठा वाटा आहे. स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांमध्ये नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी होत असतात. त्यातही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या ‘आषाढी दिंडी'ला स्वच्छतेची जोड देऊन ज्ञानदीप सेवा मंडळाच्या शाळेतील मुख्यध्यापक आणि शिक्षकांनी पुढाकार घेत ‘स्वच्छता दिंडी'चे आयोजन केल्याची बाब प्रशंसनीय असल्याचे मत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केले. नवी मुंबईचे भविष्य असणाऱ्या पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी सदर ‘स्वच्छता दिंडी'मध्ये मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला, त्याबद्दल डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, स्वच्छता अधिकारी विजय नाईक तसेच स्वच्छता निरीक्षक आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ‘ज्ञानदीप सेवा मंडळ'च्या प्राथमिक शाळेचे (मराठी माध्यम) मुख्याध्यापक बंकट तांडेल, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक रत्नाकर तांडेल आणि संस्था कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र तांडेल तसेच इतर शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी आणि २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभागी होत विठ्ठल नामासह स्वच्छतेचा गजर केला.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने विठ्ठल भक्तीप्रमाणेच समाजहिताला प्राधान्य देत प्रबोधनाचाही संदेश सर्वदूर प्रसारीत केला आहे. त्याचे प्रतिबिंब या ‘स्वच्छता दिंडी'तून उमटलेले दिसले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणजे पाणथळ क्षेत्रावर ‘सिडको'द्वारे काँक्रीट प्रकल्पाची योजना