विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासाठी आयुक्तांची ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी भेट

 ठाणे मधील विज्ञान केंद्राच्या कामास युध्दपातळीवर सुरुवात - महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे मध्ये विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान केंद्र साकारण्याबाबत मार्गदर्शन घेणे, याबाबतचा आराखडा आणि अनुषंगिक बाबींबाबतची चर्चा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्यासोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच बैठक घेतली. या चर्चेदरम्यान ठाणे शहरातील नियोजित जागेवर विज्ञान केंद्र उभारण्याबाबत सर्वंकष प्रस्ताव तयार करुन युध्दपातळीवर कामास सुरुवात केली जाईल, असा विश्वास यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशाच्या विविध भागात प्रादेशिक विज्ञान केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. याचा लाभ निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना, विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात विज्ञान केंद्र उभारणीसाठी डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना केली होती. त्यानुसार सदर बैठक झाली. या बैठकीस ‘मराठी विज्ञान परिषद'च्या ठाणे विभागाचे प्रा. ना. द. मांडगे देखील उपस्थित होते.
ठाणे शहरामध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्राची उभारणी बाळकुम विभागातील महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडावर होणार आहे. यामध्ये ५ हजार चौ. मी. जागेत प्रत्यक्ष प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना डॉ. अनिल काकोडकर यांनी बैठकीत केली. तसेच यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि ठाणे शहरात कार्यरत असलेल्या मराठी विज्ञान परिषद यांचे सहकार्य घेवून प्रस्ताव तयार करुन तो शासनास सादर करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या जलद गतीने व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कालबध्द पध्दतीने सदर प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे शहरातील विज्ञान केंद्रात मुलभूत विज्ञान, भारतीय विज्ञान, कृषी जैविक शास्त्र, अवकाश विज्ञान, उर्जा आणि पर्यावरण, माहिती विज्ञान, विज्ञान शोधिका, तारामंडळ, विज्ञानवाटिका अशा सुविधा तसेच गोलाकार त्रिमिती चित्रपट संकुल, चित्रपट गृहसंकुल, नाविन्यपूर्ण हब, नोबेल म्युझिअम, कॉन्फरन्स सुविधा, शैक्षणिक इमारत, होस्टेल इमारत आणि फिरते विज्ञान प्रदर्शन आदी सुविधा असाव्यात, असे डॉ. अनिल काकोडकर यांनी या बैठकीत नमूद केले. या सर्व घटकांचा समावेश करुन विज्ञान केंद्र उभारणीबाबतचा आराखडा तयार करुन तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ठाणे शहरामध्ये विज्ञान केंद्र साकारल्यानंतर ठाणे शहराबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व्यक्त केला. डॉ. अनिल काकोडकर यांनी ठाणे मध्ये विज्ञान केंद्र उभारणीसाठी पुढाकार घेवून सहकार्याची भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत आगामी काळातही आपले सहकार्य मिळेल असेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
ठाणे शहराचे ठिकाण शहर आणि ग्रामीण भागाच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. एका बाजूला संपूर्ण विकसित एमएमआर क्षेत्र तर दुसऱ्या भागात ग्रामीण तसेच आदिवासी पट्टा, त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर विज्ञान केंद्राचा लाभ घेता येईल, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. सदर विज्ञान केंद्राचे परिचलन महापालिका मार्फत होणार असून, परिचलन खर्चाच्या दृष्टीने विज्ञान केंद्र स्वयंपूर्ण कसे बनेल याकडे विशेष लक्ष देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवयवदान व नेत्रदान, पर्यावरण आणि पसायदान विषयावरील व्याख्यानमालेस चांगला प्रतिसाद