राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यान

 प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना माहिती - प्रा. डॉ. रमेश जाधव

ठाणे  : व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्राथमिक शिक्षणाचे स्थान मोलाचे असते, असा विचार राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यातून पुढे नेला. सामाजिक सुधारणा, उद्योग आदींबाबत निर्णय घ्ोतानाही त्याचा पाया प्राथमिक शिक्षणाच्या सबलीकरणात शोधण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात केला, असे प्रतिपादन संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी ‘विचारमंथन व्याख्यानमाला'चे चौथे पुष्प गुंफताना केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९व्या जयंती दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे २६ जून रोजी ठाणे शहरातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह मध्ये प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आणि विचार' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भाषणापूर्वी, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे पुस्तके, शाल आणि चित्रप्रतिमा देऊन स्वागत केले.

शाहू महाराजांनी गादीवर येण्यापूर्वी संपूर्ण संस्थानाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना गावांमध्ये प्राथमिक शाळांचा अभाव जाणवला. कुठे शाळा होती तिथे शाळेच्या वास्तूची पडझ़ड झालेली आढळली. काही ठिकाणी शाळेत शिक्षक नव्हते. सर्व परिस्थिती पाहिल्यावर शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा आदेश काढला. तसेच, त्यादृष्टीने आर्थिक तजवीज सुरू केली, असे डॉ. रमेश जाधव यांनी सांगितले.

 शाहू महाराजांनी कारभार हाती घेतला तेव्हा संस्थानात २२४ शाळा होत्या आणि १५ हजार विद्यार्थी होते. त्यांच्यावर संस्थानाच्या एकूण उत्पन्नापैकी ३.५ टक्के खर्च होत होता. तो शाहू महाराजांनी वाढवला. खर्चासाठी शाळांना धार्मिक संस्थांच्या उत्पन्नाशी जोडून दिले. १९२२मध्ये शाळांची संख्या ४०० पेक्षा पुढे गेली. २२ हजार विद्यार्थी झाले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केल्यावर कोल्हापूर संस्थानात शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला, असे डॉ. रमेश जाधव यांनी स्पष्ट केले.

महात्मा ज्योतीराव फुले यांचा शिक्षणाचा विचार, सत्यशोधक चळवळ शाहू महाराजांनी पुढे नेली. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची मोहिम शाहू महाराजांनी हाती घेतली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती देण्यास सुरूवात केली. अस्पृश्यता निवारणासाठी घेतलेल्या निर्णयानुसार, शाळेबाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसण्याची व्यवस्था शाहू महाराजांनी केली. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, त्यात अडसर आणू नये, यासाठी विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्यांच्या पालकांना दंड करण्यास सुरुवात केली, अशी माहिती डॉ. रमेश जाधव यांनी दिली.

 प्रामाणिकपणे शिकविणाऱ्या शिक्षकांवर शाहू महाराज यांचे विशेष लक्ष होते. शिक्षकाने व्यवसायाशी प्रामाणिक असावे, या व्यवसायाचा मानसन्मान राखला जावा, यावर शाहू महाराजांचा कटाक्ष होता. संस्थानातील शिक्षणाची व्यवस्था उभी करतानाच शाहू महाराजांनी संस्थानाबाहेर, पुणे, नाशिक, पंढरपूर, कराची, मुंबई आदी भागातील संस्थाना आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाहू महाराजांनी सुरु केलेली वसतीगृहांची चळवळ तर त्यांच्या कार्याचा फार मोठा पैलू आहे, असे डॉ. रमेश जाधव यांनी नमूद केले.

शाहू महाराजांचे शिक्षणासाठीचे योगदान, शाळांची उभारणी, अस्पृश्यता निवारणासाठी उचलेली पावले यांच्याविषयी डॉ. रमेश जाधव यांनी व्याख्यानात अनेक उदाहरणे दिली. अल्पायुष्यातही शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतीकारी कार्याचा यथोचित गौरव डॉ. रमेश जाधव यांच्या व्याख्यानात होता. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासाठी आयुक्तांची ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी भेट