माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या ५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वक्ते राहुल सोलापूरकर यांच्या व्याख्यानाप्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार होणे अत्यंत उत्तम योग असणारी आनंदाची गोष्ट - राजेश नार्वेकर

नवी मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या ५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकात सुप्रसिध्द अभिनेते, वक्ते राहुल सोलापूरकर यांच्या ‘राजर्षी शाहू विचार वारसा' या व्याख्यानानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अभिनेते राहुल सोलापूरकर, समाज विकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव तसेच माजी महापौर सुधाकर सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या २१ माध्यमिक शाळांतून एसएससी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक ९३.८० टक्के गुण संपादन करुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय मनपा माध्यमिक शाळा क्रमांक-१०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाले (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थिनी गायत्रीदेवी मनोजकुमार योगी हिला आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

महापालिका शाळा क्रमांक-१०६ सेक्टर-५, कोपरखैरणे येथील तनुजा पोपट पाटील या विद्यार्थिनीला तसेच माध्यमिक शाळा क्र.१०४ रबाले (हिंदी माध्यम) येथील पवनकुमार उमाशंकर यादव या विद्यार्थ्याला माध्यमिक शाळांतून द्वितीय क्रमांकाचे ९३४० टक्के गुण संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

तसेच राजर्षी शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक-१०४ डॉ. आंबेडकर नगर, रबाले (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थिनी नितू लालचंद यादव आणि कोपरखैरणे येथील महापालिका शाळा क्र.१०६ येथील विद्यार्थिनी भाग्यश्री अशोक सावंत यांना ९३.२० टक्के गुण प्राप्त करुन संयुक्तपणे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन नवी मुंबई महापालिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून त्याची प्रचिती महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत मिळविलेल्या गुणात्मक यशावरुन दिसून येत आहे. ‘ज्ञान हीच शक्ती' संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात तसेच शिक्षणाचे महत्व ओळखून सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिध्द अभिनेते, वक्ते राहुल सोलापूरकर यांच्या व्याख्यानाप्रसंगी महापालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणे अत्यंत उत्तम योग असणारी आनंदाची गोष्ट आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर!