आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत 24 x 7 तत्त्वावर राहणार कार्यरत

‘सिडको'चा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज

नवी मुंबई : दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये ‘सिडको'तर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्‌भवणाऱ्या संभाव्य आपत्ती, दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या कालावधीत ‘सिडको'चा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो. त्यानुसार ‘सिडको'चा आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर २०२३ या पावसाळी कालावधीमध्ये 24 x 7 तत्त्वावर कार्यरत असणार आहे.

सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला सदर नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग, आदि महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास संपर्कात असतील.

‘सिडको'च्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर-पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते अथवा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग-आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल. 

नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही आपत्ती उद्‌भवल्यास देण्यात आलेल्या दूरध्वनी अथवा व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर किंवा ई-मेल द्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी.
दूरध्वनी क्र. ०२२-६७९१८३८३/८३८४/८३८५, २७५६२९९९
टोल फ्री क्र. १८००२२६७९१
व्हॉटस्‌ॲप क्र. ८८७९४५०४५०
फॅक्स क्र. ०२२-६७९१८१९९
ई-मेल ादम्ॅम्ग्‌म्दग्ह्‌ग्ी.म्दस्

‘सिडको'तर्फे खारघर, पनवेल (पूर्व), पनवेल (पश्चिम), कळंबोली, नावडे, काळुंद्रे, तळोजा आणि कामोठे नोडचे हस्तांतरण पनवेल महापालिकाकडे करण्यात आले असून या परिसरातील पावसाळी कामांसहित पायाभूत सुविधांच्या देखभालीसह आपत्ती व्यवस्थापनासंबंधी पनवेल महापालिकेला माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी.

नागरिकांमार्फत फोनवरुन अथवा व्हॉटस्‌ॲप वरुन माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यावर नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने निर्णय घेऊन ज्या नोडमध्ये सदर घटना घडली असेल तेथील प्रमुख अधिकाऱ्यास घटनेसंबंधी माहिती कळवतील आणि त्यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील. तसेच नियंत्रण कक्ष आवश्यक असलेल्या अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचविण्याची दक्षता घेईल. नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित ‘सिडको'चे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्वाची भूमिका सदर नियंत्रण कक्ष पार पाडेल. संबंधित घटनेसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती आणि सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरवणार आहेत. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल.


याशिवाय धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री २४ तास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे ‘सिडको'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे ‘सिडको'चे आवाहन