‘महावितरण'च्या भरारी पथकाची कारवाई

नेरुळ गावात ९.१६ लाखांची वीज चोरी  पकडली

नवी मुंबई : नेरुळ गावात राहणाऱ्या व्यक्तीने विद्युत मीटरला बायपास करुन आपल्या घरात डायरेक्ट वीज जोडणी घेऊन मागील तीन वर्षापासून तब्बल ९  लाख १६ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मकरंद रघुनाथ कडू असे या व्यक्तीचे नाव असून ‘महावितरण'च्या भरारी पथकाने त्यांच्या घरगुती वीज मीटरची तपासणी केल्यानंतर वीजचोरीचा सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ‘महावितरण'ने मकरंद कडू याच्यासह त्याच्या आई विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

‘महावितरण'च्या भरारी पथकाने जास्त उपकरणे वापरणााऱ्या; परंतु वीज बील कमी येणाऱ्या घरांची माहिती काढून त्या घरांच्या वीज जोडणी तपासणीला सुरुवात केली आहे. या तपासणीत नेरुळ गावातील रघुनाथ कडू यांच्या घरात एकापेक्षा जास्त एअर कंडीशन तसेच इतर विद्युत उपकरणे असताना, त्यांच्या घराचा विद्युत भार ५.६ केडब्ल्यु इतका असल्याचे आढळून आले. त्यामुळे कडू यांना खूप कमी विजेचे बील येत असल्याने ‘महावितरण'च्या वाशी परिमंडळातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे आणि त्यांच्या भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी कडू यांच्या घरी भेट दिली होती.  

त्यावेळी कडू यांच्या घरगुती विजेचे मापन व्यवस्थितरित्या होऊ नये यासाठी कडू यांनी वीजेचे मीटर बायपास करुन डायरेक्ट वायर जोडल्याचे आणि त्याद्वारे तो घरामध्ये वीज वापर करत असल्याचे आढळून आले. कडू यांनी जुलै २०२० पासून ३६ महिने वीजेची चोरी करुन ‘महावितरण'चे तब्बल ९ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले. त्यानुसार ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी कडू यांच्या घराची वीज जोडणी तोडून त्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी नेरुळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वर्षाला सरासरी ३०० मांजरींचे लसीकरण