‘वसुधैव कुटुंबकम्‌ योग'द्वारे नवी मुंबईकराकडून योग दिन साजरा

लहान मुलांमध्ये योगाचे महत्व रुजविणे शहराच्या आरोग्यपूर्णतेसाठी चांगली बाब -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : ‘वसुधैव कुटुंबकम्‌करिता योग' या संकल्पनेवर आधारित नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने, सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने वाशीमधील सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे उत्साहात पार पडला.

याप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह महापालिका अधिकारी-कर्मचारी तसेच ७५० हुन अधिक योग संस्थांचे पदाधिकारी -सदस्य तसेच योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘द आर्ट ऑफ लिव्हींग'चे योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे यांच्यासह सर्वांनी विविध योगप्रकार करीत आत्मिक शांती आणि समाधानाचा अनुभव घेतला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी तणावमुक्त जगण्यासाठी योग महत्वाचा असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जागतिक योग दिन'ची मांडलेली संकल्पना आज संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरी केली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांनी सदर आरोग्यदायी उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी पाहून आनंद व्यक्त केला. लहान वयातच मुलांमध्ये योगाचे महत्व रुजविण्यात येत आहेत. ती मुलांच्या आणि शहराच्या आरोग्यपूर्णतेसाठी चांगली गोष्ट असल्याचेही  त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या पाठिंब्याने आयोजित करण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी उमेद जागविणारा असल्याचे सांगत आजच्या धकाधकीच्या युगात योग काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. योगाचे शारीरिक, मानसिक असे खूप लाभ असून केवळ आजच्या एका दिवसापुरता नाही तर योगाचा अंगिकार नियमित करावा, असे आवाहन आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी केले.   

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘वसुधैव कुटुंबकम्‌करिता योग' या संकल्पनेवर आधारित प्रत्येक घरी अंगणी योग या घोषवाक्यास अनुसरुन सिडको तसेच द आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या सहकार्याने अत्यंत उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले. यावेळी ‘ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय'च्या वतीने शिलादिदी यांनी मनोयोगाची ध्यानधारणा करुन घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विविध संस्था ‘दिबां'च्या स्मृतिदिनानिमित्त रवतदान शिबिरासाठी एकवटल्या