महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

 नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ‘केंद्रीय जलशक्ती मंत्रालय'च्या वतीने ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन


मुंबई : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पध्दतीने केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषद, जालना जिल्ह्यातील कडेगांव ग्रामपंचायत आणि ‘भारतीय जैन संघटना' यांना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते ४ थ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार'ने गौरविण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ‘केंद्रीय जलशक्ती मंत्रालय'च्या वतीने ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, केंद्रीय सचिव पंकज कुमार, आदि उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महापालिकांना, नगरपालिकांना, ग्रामपंचायतींना उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगांव ग्रामपंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. सदर पुरस्कार मेघालय राज्यातील री-भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्रामपंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.

 सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगरपरिषदला उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा जलनिःस्सारण-आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. सदरचा पुरस्कार सुरत महापालिकेसह विभागून देण्यात आला.

तर स्वयंसेवी सामाजिक संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटना'ला (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार ना. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. बीजेएस संस्था मागील ३७ वर्षांपासून जलस्त्रोत विकास, मुल्य आधारित शालेय शिक्षण, आपत्ती प्रतिसाद-व्यवस्थापन या विषयांवर अविरत काम करीत आहे. २०१३ पासून जलसंधारणावर सातत्याने संस्थेचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, जलाशयांचे आणि तलावांचे पुनरुज्जीवन, त्यातून निघणारी माती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे नापीक झालेली जमीन सुपीक होत आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी साधारण ६५ % खर्च गाळ शेतात नेऊन टाकण्याचा असतो तो शेतकरी स्वतः उचलतात, हे विशेष. राज्यातील बुलढाणा जिल्ह्याला जलपर्याप्त करण्याचे महत्त्वाचे नियोजन कार्य बीजेएस संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे. आता संस्था राज्य सरकारची ‘गाळ-मुक्त धरण- गाळयुक्त शिवार' योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारी यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तणावमुक्तीसाठी प्रत्येक कार्यालयात किमान १५ मिनिटे योगाभ्यास करण्याची राज्यपालांची सूचना