कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन यांच्या पुर्नआखणीचा आराखडा तयार करण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त तसेच रिक्षा परिचलनाला शिस्तीसाठी वाहतूक पोलिसांचे सातत्यपूर्ण सहकार्य आवश्यक
 

ठाणेः कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथील वाहतुकीचे परिचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या दोन्ही जंक्शनची पुर्नआखणी करण्यात येणार असल्याने त्यासाठी सविस्तर आराखडा (टोटल स्टेशन सर्व्हे) करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
 
कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वरील वाहतुकीचे परिचलन अनियोजित पद्धतीने होते आहे. मोकळ्या मैदानात वाहने हवी तशी ये जा करत असल्याचे चित्र या भागात दिसते. हे चित्र बदलण्यासाठी लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक बेटाची रचना यांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. वाहतुकीचे परिचलन सुनियोजित पद्धतीने व्हावे म्हणून आराखडा तयार करून त्याची जलद अमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
 
अधिकृत पार्किंग
 
कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांवर असमाजिक तत्त्वांचा वावर असतो. गर्दुल्ले, दारुडे सर्रास वावरत असतात. अनधिकृत पार्किंग केले जाते. याला आळा बसण्यासाठी मळक्या, अस्वच्छ जागा साफ करून तेथे नियंत्रित अधिकृत पार्किंग केले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या जात आहेत. जागेच्या वापराबरोबर महापालिकेस त्यातून उत्पन्नही मिळेल, असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.
 
त्याचबरोबर, वागळे इस्टेट मधील रस्ता क्रमांक २२ वरील पासपोर्ट कार्यालय येथेही अधिकृत पार्कींग हेत आले यासाठी निविदा मागविल्या जात आहेत. या भागात अनधिकृत पार्किंग केले जाते व त्याचे पैसेही अनधिकृतपणे आकारले जातात, अशा तक्रारी  आल्या होत्या. त्याबद्दल पालिकेने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
 
पावसाळ्यात विटावा पुलाखाली जमणारे पाणी वाहतुकीस अडथळा करते. त्यामुळे त्या भागाची वाहतूक पोलिसांबरोबर संयुक्त पाहणी करण्यास आयुक्त बांगर यांनी सांगितले. तसेच, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन येथे झेब्रा क्रॉसिंगचे काम पावसाची उघडीप असतानाच करून घ्यावे, असेही आयुक्त बांगर यांनी बैठकी दरम्यान नमूद केले. त्याशिवाय, नितीन कंपनी चौकातील सिग्नलची आवश्यकता, वाहनांना दिला जाणारा वेळ यांचाही आढावा घेण्यास आयुक्त बांगर यांनी सांगितले.

रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त राहील, याची काळजी घ्यावी. तसेच, रिक्षा परिचलनाला शिस्त लागण्यासाठी तेथे वाहतूक पोलिसांचे सातत्यपूर्ण सहकार्य आवश्यक असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
 
महापालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या या आढावा बैठकीस, पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड, नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उप नगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१३ ते १६ जून दरम्यान ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकामे विभागातर्फे विशेष मोहीम