एपीएमसी बाजारात प्रतिदिन अवघे १५० बॉक्स दाखल

यंदा मान्सून लांबल्याने ‘सीताफळ'चा हंगाम लांबणीवर

वाशी : यंदा मान्सून लांबल्याने वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये सीताफळाच्या हंगामाला उशीर झाला आहे. एपीएमसी बाजारात सध्या दररोज सीताफळाचे अवघे १५० बॉक्स दाखल होत आहेत. एपीएमसी फळ बाजारात जून मध्ये सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढते, अशी माहिती एपीएमसी बाजारातील फळ व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि नगर जिल्ह्यातून वाशी मधील एपीएमसी बाजारात सीताफळ दाखल होत असून, नोव्हेंबर महिन्यापर्यंत या फळाचा हंगाम सुरु असतो. १५ जून नंतर एपीएमसी बाजारात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते. तर जुलै-ऑगस्टमध्ये एपीएमसी बाजारात सीताफळाची आवक वाढते. मात्र, यंदा मान्सून लांबला असल्याने सीताफळाच्या हंगामाला देखील १५-२० दिवस उशिराने सुरुवात होणार असून, १५ जुलै नंतर एपीएमसी बाजारात सीताफळाची आवक वाढेल, असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले.


सीताफळाचा हंगाम चार महिने असतो. सीताफळ उत्पादक शेतकरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात छाटणी करीत असतात. त्यांनतर साधारण एक महिन्याच्या कालावधीत पिकाला पाणी देण्यात येत नाही. त्यानंतर मात्र सीताफळ पिकाला पाण्याची, पावसाची अधिक गरज भासते. सीताफळ परिपक्व होण्यासाठी चार ते साडेचार महिन्याचा कलावधी जातो. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सीताफळ पीकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. परिणामी सीताफळ पीक उत्पादन घेण्यास उशीर लागत आहे. यंदा मान्सून लांबला आहे. त्यामुळे पिकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नसल्याने सीताफळ हंगामाला विलंब होणार आहे. सीताफळाची चांगली वाढ तसेच परिपक्व होण्यासाठी जास्त पाणी लागते. जादा पाणी सीताफळ पीकाला पूरक वातावरण निर्मिती करते. त्यामुळे सीताफळ परिपवव आणि आकाराने मोठे होते. पाण्याचा अभाव असलेल्या सीताफळ पीक उत्पादनाला परिपक्व होण्यासाठी विलंब लागतो. तसेच सीताफळाची वाढ खुंटते. सध्या एपीएमसी बाजारात सध्या दररोज सीताफळाचे १५० बॉक्स दाखल होत असून, प्रतिकिलो १४०-२०० रुपयांनी सीताफळाची विक्री होत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन यांच्या पुर्नआखणीचा आराखडा तयार करण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश