२ मशीनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे महापालिका क्षेत्रात आता यांत्रिक पध्दतीने सफाई

 ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील मोठे रस्ते यांत्रिक पध्दतीने सफाई करण्यासाठी घण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ जून रोजी संपन्न झाले.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते, शौचालये, स्वच्छता आणि सुशोभिकरण यांची कामे सुरु आहेत. याच मोहिमेत ठाणे मधील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी ६ सफाई यंत्रे घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सफाई यंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, आदि उपस्थित होते.

ठाणे शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई सदर यंत्रांद्वारे करण्यात येणार आहे. १७ जून रोजी सकाळपासून या गाड्यांच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती महामार्ग, वागळे इस्टेट या परिसरात सफाई सुरु करण्यात आली.

सद्यस्थितीत अशी यंत्रे बसवलेल्या दोन गाड्या महापालिकेकडे आल्या आहेत. एक गाडी दिवसभरात सुमारे ४० कि.मी. रस्त्यांची सफाई करु शकेल. सदर यंत्रे असलेल्या आणखी चार गाड्या उपलब्ध करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्या लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होतील. या गाड्यामुळे शहरातील मोठ्या रस्त्यांची सफाई जलदगतीने होण्यास मदत होईल. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम या गाड्या करतील. त्याचबरोबर शहरातील छोट्या गल्ल्यांमध्ये साफसफाई व्हावी, या दृष्टीने लहान इलेक्ट्रीकल गाडी आणण्याचाही विचार असल्याची माहिती महापालिका आयुक्त बांगर यांनी दिली.

यांत्रिक पध्दतीने केली जाणारी सफाई मनुष्यबळाचा वापर करुन होत असलेल्या सफाईला पर्याय ठरु शकत नाही. परंतु, यांत्रिक पध्दतीने सफाई सुरु केल्यामुळे त्या ठिकाणचे मनुष्यबळ इतर रस्त्यांवरील सफाईसाठी वापरणे शक्य होईल. जेणेकरुन मनुष्यबळाद्वारे केल्या जाणाऱ्या सफाईची कार्यक्षमता वाढवता येईल, असे आयुक्त बांगर म्हणाले.
दरम्यान, यांत्रिक पध्दतीने सफाईमध्ये मशीनची देखभाल-दुरुस्ती कळीचा मुद्दा असतो. मशीन नवीन असताना जी कार्यक्षमता असते ती मशीन जुनी व्हायला लागल्यावर कमी होणे अपेक्षित नाही. त्यामुळे संपूर्ण कालावधीत सफाईची कार्यक्षमता समान राहील, देखभाल-दुरुस्ती  अत्युच्च दर्जाची राहील, याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
 

यांत्रिक सफाईमुळे रस्त्यावरील कचरा उचलण्यास मदत होईल. तसेच रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला असलेली धूळ साफ करण्यास मोठी मदत होईल. महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, काँक्रिटचे रस्ते यांची सफाई या पध्‌दतीने करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त-ठाणे महापालिका. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस आयुवतालयातील ‘हिरकणी कक्ष'चे उद्‌घाटन