ममता कक्षामध्ये स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि आरामदायी सुविधा

मध्य रेल्वेच्या 7 रेल्वे स्थानकांत ममता कक्ष सुरु

नवी मुंबई : नवजात अथवा लहान बाळासह प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या स्तनदा मातांसाठी आपल्या मुलांना स्तनपान करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचाच विचार करुन मध्य रेल्वेने 7 रेल्वे स्थानकांमध्ये 13 ठिकाणी ममता कक्ष उभारले आहेत. त्यामुळे स्तनदा मातांना प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकातील ममता कक्षामध्ये आपल्या  बाळाला सुरक्षितपणे स्तनपान करता येणार आहे. नॅशनल इंजिनिएटिव्ह फॉर फीडिंग ऍड रेस्टिंग इफ्रास्ट्रक्चर फॉर स्टेशन्स या धोरणांतर्गत हे कक्ष सुरु करण्यात आले असून अनेक महिलांनी या ममता कक्षांचे स्वागत केले आहे.  

नवजात अथवा लहान बाळासह बाहेर असताना प्रवासादरम्यान आपल्या मुलांना स्तनपान करण्याचा अनुभव सुखद नसतो, याचा अनुभव 70 टक्के भारतीय मातांनी एका सर्वेक्षणामध्ये नोंदवला आहे. गत 1 ते 7 ऑगस्ट या स्तनपान सफ्ताहा निमित्ताने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे रेल्वे स्थानके, एसटी बस स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्तनपान करता यावे, याबाबत विशेष सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना काही सामाजिक संस्था व महिला प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केल्या होत्या.  

सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या जागांची निर्मिती करायला हवी अशी मागणी महिला प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर स्तनदा मातांच्या तक्रारी आणि सूचना रेल्वेकडे प्रात झाल्यानंतर मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे मार्गावरील काही महत्वाच्या व गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर स्तनदा मातांसाठी विशेष कक्षांची सुरुवात केली आहे. नॅशनल इंजिनिएटिव्ह फॉर फीडिंग ऍड रेस्टिंग इफ्रास्ट्रक्चर फॉर स्टेशन्स या धोरणांतर्गत हे कक्ष सुरु करण्यात आले असून सीएसएमटी स्थानकावर 1, दादर-3, लोकमान्य टिळक टर्मिनस-3, ठाणे-2, कल्याण-1, पनवेल-1 लोणावळा-2 (उभारणी सुरु) ममता कक्ष सुरु केले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये इतर रेल्वे स्थानकात सुद्धा ममता कक्षांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडुन सांगण्यात आले आहे.  
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२ मशीनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण