वाशीत विजेचा खांब पडला

महापालिका विद्युत विभागाचा भोंगळ कारभार उघड

वाशी : नवी मुंबई शहरात मागील काही महिन्यांपासून विजेचे खांब पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. १५ जून रोजी रात्री वाशी, सेक्टर-७ येथे विजेचा खांब पडला असून त्यामुळे एका बाजुचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. या प्रकारामुळे विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

नवी मुंबई शहरात ‘सिडको'ने बसवलेले विद्युत खांब नवी मुंबई महापालिका तर्फे मागील तीन वर्षांपासून बदलण्याचे काम सुरु आहे. मात्र, नवीन खांब बदलून देखील ते पडण्याच्या घटना घडत आहे. २०२१ मध्ये पामबीच मार्ग्गावरील सानपाडा उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराच्या अंगावर विद्युत खांब पडून त्याचा मृत्यू झाला होता. १५ मार्च २०२३ रोजी नेरुळ, सेक्टर-१६ येथे नव्याने बसवलेला विद्युतखांब पडला होता. यानंतर२१ मार्च रोजी पुन्हा एकदा नेरुळ, सेवटर-१९ मधील वंडर्स पार्क जवळ नव्याने बसविण्यात आलेला खांब पडला. तर १५ जून रोजी रात्री पुन्हा वाशी, सेक्टर-७ येथे रस्त्यावर खांब पडण्याची घटना घडली आहे. मात्र, सदरची दुर्घटना रात्री घडली त्यावेळी या रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्याने कुठला अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, विद्युत खांब पडल्याने विद्युत विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.  त्यामुळे नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व  विद्युत खांबांची तपासणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ममता कक्षामध्ये स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि आरामदायी सुविधा