कुणीही या आणि कचरा टाकून जा...

जुन्या कोर्टाच्या मागे कचऱ्याचे ढीग

नवीन पनवेल : पनवेल शहरातील जुन्या कोर्टाच्या पाठीमागे मातीचे ढीग पहावयास मिळत आहेत. त्यामुळे या परिसराला बकाल स्वरुप आले आहे.

पनवेल शहरातील जुन्या कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या भूखंडावर महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र, याच भूखंडाच्या बाजुला मोठ्या प्रमाणात कचरा, माती यांचे ढीग पहावयास मिळत आहेत. बंद टॉयलेटच्या गाड्या देखील येथे बाजुलाच उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कुणीही या आणि कचरा टाकून जा अशी गत येथे झालेली दिसून येत आहे. एकीकडे स्वच्छता आणि वृक्ष लागवड यासाठी करोडो रुपये खर्च करायचे अन्‌ दुसरीकडे कचरा, माती डम्पिंग करणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे, अशी पध्दत महापालिकेने अवलंबलेली दिसून येत आहे.

मोठ्या प्रमाणात माती, कचऱ्याच्या ठिकाणी टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. मातीचे ढिगारे, कचरा टाकणाऱ्यांना महापालिकेचे अधिकारी पाठबळ देत आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यात कचरा भिजून दुर्गंधी पसरु शकते. त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी सदर ठिकाणच्या वृक्षांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्याची अनेक वृक्षांना झळ बसली होती. महापालिकेच्या भूखंडावर मातीचे ढिगारे आणि कचरा येतोच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीत विजेचा खांब पडला