आयुक्त दालनातून आकर्षक कलाकृतीद्वारे ‘थ्री आर'च्या संदेशाचे प्रसारण

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून नवी मुंबईच्या नकाशाची निर्मिती

नवी मुंबई : पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. १०९.५९ चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, बेलापूर अशा ८ विभागांमध्ये सामावलेली आहे. अशा नवी मुंबई महापालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा नुकताच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून करण्यात आलेली आहे.

यापूर्वी महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागात लावण्यात आलेल्या संगणकीय टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या मदर इंडिया बोर्ड स्वरुपातील भारताच्या नकाशाची विक्रमी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌ मध्ये राष्ट्रीय पातळीवर झालेली असून अशाच प्रकारचा नकाशा कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्कमध्ये लावण्यात आलेला आहे. सदर नकाशे संगणकातील अथवा लॅपटॉपमधील विविध टाकाऊ साहित्यापासून बनविण्यात आलेले आहेत.

याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा ५ फुट उंचीचा नादुरुस्त संगणक आणि लॅपटॉपधील मदरबोर्ड तसेच इतर साहित्यापासून तयार केलेला नकाशा महापालिका मुख्यालयातील आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला आहे. २३ निरुपयोगी लॅपटॉप, संगणकातील सर्कीट बोर्ड, कन्डेन्सर बॅटरी आणि वायर्स यांचा वापर करुन बनविलेला सदर नवी मुंबईचा नकाशा त्याच्या आगळ्या-वेगळ्या स्वरुपामुळे पटकन लक्ष वेधून घेतो.

नवी मुंबईतील वेस्ट टू बेस्ट आर्टिस्ट किशोर बिश्वास यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मदर इंडिया बोर्ड नकाशासारखाच नवी मुंबई शहराचा नकाशाही टाकाऊ वस्तुंपासून बनविलेला असून त्यामुळे आयुक्त दालनाची शोभा वाढली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत थ्री आर संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले जात असून कचरा कमी करणे (Reduce), कचऱ्याचा पुनर्वापर करणे Reuse) आणि कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करणे (Recycle) अशा प्रकारे ‘थ्री आर'ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये रियुज अर्थात कचऱ्याचा पुनर्वापर करणे या संकल्पनेनुसार संगणकीय निरुपयोगी साहित्यापासून नवी मुंबईचा नकाशा बनविण्यात आलेला असून आयुक्तांच्या भेटीसाठी येणाऱ्या मान्यवर आणि नागरिकांमध्ये याद्वारे ‘थ्री आर'च्या संदेशाचे प्रसारण होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कुणीही या आणि कचरा टाकून जा...