एसटी बस कोसळली नाल्यात  

रस्त्यावर बंद पडलेल्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस कोसळली नाल्यात  

नवी मुंबई : रस्त्यावर बंद पडलेल्या एनएमएमटी बसला वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबई सेंट्रल येथून महाबळेश्वर येथे जाणारी एसटी बस खारघर येथे रस्त्यालगतच्या 6 फुट खोल नाल्यात कोसळल्याची घटना बुधवार (दि.14) रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात एसटी बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथून महाबळेश्वरला जाणारी एसटी बस सायन-पनवेल मार्गावरील खारघर हिरानंदनी ब्रिज जवळ आली होती. मात्र येथील भररस्त्यामध्ये एनएमएमटी बस बंद पडल्याचे एसटी बस चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने सदर बसला वाचविण्याच्या नादात एसटी बस डाव्या बाजूला घेतली. याचवेळी चालकाचे एसटी वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर एसटी बस फुटपाथवर चढुन रस्त्यालगत असलेल्या 6 फूट खोल नाल्यात कोसळली.  

सदर एसटीमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते. मात्र यातील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहीती मिळताच खारघर पोलिसांनी तसेच एसटी विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त एसटी बसमधील सर्व प्रवाशांना पर्यायी बस उपलब्ध करुन देत त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवुन दिले. या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून दोन क्रेनच्या सहाय्याने हि एसटी बस बाहेर काढण्यात आली. खारघर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पहिल्या तिमाहीत 253.86 कोटींची विक्रमी वसुली