पहिल्या तिमाहीत 253.86 कोटींची विक्रमी वसुली

मालमत्ता करामधील 10 % सवलत 30 जूनपर्यंत लागू राहिल : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे : मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. करदात्यांनी आपला कर महापालिकेकडे विहित मुदतीत जमा करावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जे करदाते दिनांक 01.04.2023 ते 15.06.2023 या कालावधीत पहिल्या सहामाहीच्या करासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर भरतील अशा नागरिकांना 10 %  सवलत जाहिर केली होती. या सवलत योजनेस करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या तिमाहीत एकूण 253.86 कोटी विक्रमी वसुली होण्यास मदत झाली आहे. गेल्यावर्षी सन 2022-23 मध्ये याच कालावधीत 185.86 कोटी इतकी वसुली झाली होती. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 36 % जास्त वसुली झाली आहे. या पार्श्वभूमीवर सदरची सवलत दिनांक 30.06.2023 पर्यत वाढविण्यात आली असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके करदात्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तसेच जे करदाते दिनांक 01.04.2023 ते 15.06.2023 या कालावधीमध्ये पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या रक्कमेसह दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेचा कर असा एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेतील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात आली होती.  तर 16.06.2023 ते 30.06.2023 या कालावधीत कर भरणाऱ्यांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य कराच्या रकमेत 4 %  सूट जाहिर करण्यात आली होती. या सवलतीस करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीनुसार सामान्य करातील 10% सवलत ही दिनांक 30.06.2023 पर्यंत अंतिमत: वाढविण्यात येत असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले.

 करवसुलीसाठी उपाययोजना
 
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक/ करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोई-सुविधा  वापरु शकतील. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड आकारण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी कार्यप्रणाली राबविण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची व कोणास भेटण्याची गरज पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

 प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

 मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रावर सोमवार ते शनिवार स. 10.00 सायं. 5.00 वा. या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल. त्याशिवाय, ऑनलाईन कर भरणा सुविधाही कार्यरत आहे.  करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या  लिंकद्वारे   अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरून उपलब्ध करून घेवू शकतील. तसेच या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच Google Pay, PhonePe, PayTm, BHIMApp याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छता कार्यात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई